दापोली: खेड-दापोली मार्गावरील शिरशिंगे रोडवर वाकवली फाटा येथे एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला असून, या अपघातात दुचाकीस्वार गणेश नंदकुमार सातनाक (वय ४२, रा. वाकवली) हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी दापोली पोलिसांनी बस चालक स्वप्नील बाळकृष्ण माने याच्याविरुद्ध बेदरकारपणे वाहन चालवल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात २५ मार्च २०२६ रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास घडला. आरोपी चालक स्वप्नील माने हा कोल्हापूर ते दापोली या मार्गावर धावणारी एसटी बस (क्रमांक एमएच २० बीएल १६७६) घेऊन दापोलीच्या दिशेने जात होता. यावेळी वाकवली फाट्याजवळ रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, बस वेगाने आणि चुकीच्या बाजूने चालवून त्याने समोरून येणाऱ्या गणेश सातनाक यांच्या दुचाकीला (क्रमांक एमएच ०८ एफ ५३५०) जोराची धडक दिली. या भीषण धडकेत सातनाक यांच्या नाकाला आणि तोंडाला गंभीर दुखापत झाली आहे.
या अपघातानंतर ठेकेदार लक्ष्मण विठ्ठल नाटेकर (वय ४८, रा. वाकवली) यांनी दापोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत २६ मार्च रोजी दुपारी २.५३ वाजता बस चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ (अ) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर ४४/२०२६ नुसार नोंद केला आहे. अपघातास सर्वस्वी बस चालक कारणीभूत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, दापोली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
बस-दुचाकी अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी; दापोलीतील बस चालकावर गुन्हा







