रत्नागिरी: गणपतीपुळे ते चाफे दरम्यानच्या रस्त्यावर हॉटेल एकदंतसमोर शनिवारी सकाळी एका भीषण अपघातात मालगुंड येथील एका ५६ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. राजेश मधुकर साळवी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. साळवी आपल्या कुत्र्याला घेऊन रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी गेले होते, तेव्हा एका बेदरकार अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच प्राण गेला. या घटनेमुळे मालगुंड परिसरात तीव्र संताप आणि शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेश साळवी (फ्लॅट नं बी-२/२४, आर.सी. व्हिस्टा, केशवसुत स्मारकजवळ, मालगुंड, रत्नागिरी) हे शनिवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आपल्या कुत्र्याला घेऊन हॉटेल एकदंतसमोरील रस्त्यावर फिरत होते. यावेळी गणपतीपुळे ते चाफे मार्गावरून जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने रस्त्याची परिस्थिती आणि वळणे लक्षात न घेता अत्यंत निष्काळजीपणे आणि वेगाने वाहन चालवून साळवी यांना मागून जोरदार धडक दिली. या धडकेनंतर साळवी रस्त्यावर कोसळले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्या कुत्र्यालाही या अपघातात दुखापत झाली आहे का, याची माहिती अद्याप मिळालेली नाही.
या अपघातानंतर संबंधित अज्ञात वाहनाच्या चालकाने माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार केला. अपघाताची माहिती ना पोलिसांना दिली, ना साळवी यांच्या नातेवाईकांना. त्यांनी साळवी यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल न करता, आपल्या वाहनासह घटनास्थळावरून पलायन केले. काही वेळानंतर स्थानिक नागरिकांना अपघात झाल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि साळवी यांना रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था केली, मात्र दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी संतोष जयवंत देसाई (वय ४७, रा. मांजरे देसाईवाडी, ता. संगमेश्वर) यांनी दुपारी सव्वातीन वाजता रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात वाहनाच्या चालकाविरोधात भारतीय दंड संहिता कायदा २०२३ च्या कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४(ब)/१८७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ग्रामीण पोलिसांचे पथक या अज्ञात वाहनाचा आणि चालकाचा शोध घेण्यासाठी गणपतीपुळे-चाफे मार्गावरील आणि शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून, अपघातग्रस्तांना त्वरित मदत न करता पळून जाणाऱ्या चालकाचा तपास युद्धपातळीवर सुरू आहे.






