GRAMIN SEARCH BANNER

प्रशासनाच्या दुर्लक्षाला खेर्डी ग्रामस्थांचे श्रमदानाने उत्तर; दापोली-मुंबई मार्गावरील जीवघेणे खड्डे बुजवले

Gramin Varta
85 Views

दापोली: दापोली-मुंबई या प्रमुख पर्यटन मार्गावर खड्ड्यांमुळे होणारे अपघात आणि प्रवाशांची होणारी कोंडी लक्षात घेऊन खेर्डी येथील ग्रामस्थांनी प्रशासकीय मदतीची वाट न पाहता स्वतःहून पुढाकार घेत श्रमदानातून खड्डे बुजविण्याचे कौतुकास्पद कार्य केले आहे. दापोली हे ‘प्रति महाबळेश्वर’ म्हणून प्रसिद्ध असल्याने पुणे, मुंबई, नाशिक आणि सातारा येथून मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. मात्र, या मार्गावरील खड्ड्यांमुळे पर्यटकांना शारीरिक त्रासासह अपघातांना सामोरे जावे लागत होते. हीच गंभीर बाब ओळखून २७ तारखेला खेर्डी येथील ग्रामस्थांनी एकत्र येत आर्थिक योगदान आणि श्रमदानातून खेर्डी स्मशानभूमी ते मुस्लिम इंग्लिश मीडियम स्कूल दरम्यानचे जीवघेणे खड्डे सिमेंट काँक्रीटच्या साहाय्याने बुजवले आहेत.

विशेष म्हणजे केवळ खड्डे बुजवून न थांबता, ते काँक्रीट टिकून राहावे यासाठी ग्रामस्थ दिवसातून तीन वेळा यावर पाणी मारून त्याची निगा राखत आहेत. स्थानिक प्रशासनाकडून वारंवार मागणी करूनही दुरुस्ती होत नसल्याने अखेर जनतेनेच हा प्रश्न निकाली काढला आहे. या उपक्रमात सुनील दळवी, खेर्डी सोसायटीचे संचालक शैलेश कदम, माजी उपसरपंच संजय महाडेश्वर, उपाध्यक्ष अरुण करबेले, गुरुदास सवणसकर, सुजित कदम, प्रितम केळकर, राजेंद्र बैकर, संदीप महाडेश्वर, सुभाष बैकर, काशिराम बैकर, सुनील बैकर, बाळाराम जोशी, रामचंद्र कातने, नरेश पवार, दिलीप पवार, पंकज आयरे आणि स्वरूप महाजन यांसह अनेक तरुणांनी व ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ग्रामस्थांच्या या एकजुटीमुळे अपघातांचा धोका टळला असून प्रवाशांकडून समाधान व्यक्त होत आहे. मात्र, नागरिकांना स्वतः रस्त्यावर उतरून ही कामे करावी लागणे ही प्रशासनासाठी चिंतनाची बाब असल्याची भावनाही यावेळी परिसरातून व्यक्त होत आहे.

Total Visitor Counter

3388768
Share This Article