‘पाटबंधारे’च्या लाचखोर कार्यकारी अभियंत्यासह लिपिकाला पोलीस कोठडी

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

रत्नागिरी:- रत्नागिरी पाटबंधारे विभागातील लाचखोरीच्या प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी कार्यकारी अभियंता गणेश हरीदास सलगर आणि कनिष्ठ लिपिक शेखर चंद्रमणी पवार यांना शनिवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या धाडसी कारवाईमुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

कुवारबाव येथील पाटबंधारे विभागात तक्रारदाराच्या कामाची काही देयके प्रलंबित होती. ही कपात केलेली देयकाची रक्कम परत मिळवून देण्यासाठी कार्यकारी अभियंता गणेश सलगर आणि लिपिक शेखर पवार यांनी ३ लाख ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली.
रंगेहाथ पकडले

तक्रार प्राप्त होताच एसीबीच्या पथकाने सापळा रचला. लाचेच्या रकमेबाबत तडजोड होऊन २ लाख रुपये देण्याचे ठरले. कुवारबाव येथील कार्यालयात ही लाचेची रक्कम स्वीकारताना एसीबीने या दोघांनाही रंगेहाथ पकडले. त्यानंतर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

शनिवारी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *