राजापूर: तालुक्यातील ससाळे गावची सुकन्या आणि शहरातील विश्वनाथ विद्यालयाची विद्यार्थिनी निधी मनोज सप्रे हिने कॅरमच्या खेळातील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. ५९ व्या महाराष्ट्र राज्य कॅरम चॅम्पियनशिपमध्ये निधीने सलग दुसऱ्या वर्षी राज्य विजेतेपद पटकावून ‘कॅरम क्वीन’ ही पदवी सार्थ ठरवली आहे. कॅरमच्या पटावर आपल्या बोटांची जादू दाखवत तिने बारा वर्षांखालील मुलींच्या गटात हा ऐतिहासिक विजय संपादन केला.
विश्वनाथ विद्यालयात इयत्ता पाचवीमध्ये शिकणारी निधी आता ‘टू-टाइम महाराष्ट्र स्टेट चॅम्पियन’ बनली असून, तिच्या या यशाने केवळ शाळेचीच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याची मान उंचावली आहे. स्पर्धेतील सर्वच सामने अत्यंत चुरशीचे झाले, मात्र निधीने आपल्या संयमी आणि अचूक खेळाच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना नमवून हे यश खेचून आणले.
निधीला तिचे वडील आणि मार्गदर्शक मनोज सप्रे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. आपल्या मुलीच्या यशाबद्दल बोलताना मनोज सप्रे यांनी सांगितले की, माझ्या मार्गदर्शनाखाली तिने दिवसरात्र घेतलेली मेहनत आणि खेळाप्रती असलेली तिची निष्ठा यामुळेच तिने हे शिखर गाठले आहे. निधीच्या या दैदिप्यमान कामगिरीबद्दल विश्वनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद आणि शालेय व्यवस्थापन समितीने तिचे विशेष कौतुक करून तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.






