GRAMIN SEARCH BANNER

लोटे येथील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीतील घातक ‘पीफास’ उत्पादन बंद करण्यासाठी खेड तहसीलदारांना निवेदन

Gramin Varta
200 Views

खेड: लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीमध्ये उत्पादित होणाऱ्या ‘पीफास’ (PFAS) या अत्यंत घातक रसायनामुळे मानवी आरोग्य आणि पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. हे उत्पादन तातडीने आणि कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीसाठी कोकण नागरी संघर्ष समिती आणि लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण समितीच्या वतीने खेडचे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना सोमवारी निवेदन देण्यात आले. या रसायनामुळे कर्करोग, यकृताचे आजार आणि पुढच्या पिढ्यांमध्ये जन्मजात व्यंग निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात असून, या विरोधात ६ एप्रिल २०२६ रोजी भव्य मोर्चा काढण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीतील पीफास उत्पादनाची सखोल चौकशी करून प्रदूषण नियंत्रण मंडळाने सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडावी. तसेच, लोटे परिसरातील प्रदूषित पाणी आणि मातीचा स्वतंत्र वैज्ञानिक अहवाल शासनाने प्रसिद्ध करावा आणि पिण्याच्या पाण्यातील पीफासची मर्यादा आंतरराष्ट्रीय मानकांनुसार निश्चित करावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. २१ जानेवारी २०२६ पासून या घातक उत्पादनाविरोधात अशोकराव वासुदेव जाधव आणि राजेंद्र गोपीनाथ आंबे हे शांततामय मार्गाने धरणे आंदोलनास बसले असून, दोन महिने उलटूनही शासनाने दखल न घेतल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
हे निवेदन देताना कोकण नागरी संघर्ष समितीचे पदाधिकारी वशीर मुजावर, प्रणव मापुस्कर, अब्दुल गणी मोटलेकर, भालशेठ पाटणे, मुतलीफ घरटे, शकील भाई जसनाईक, प्रफुल सेवरकर यांच्यासह समितीचे अध्यक्ष सचिन चाळके, उपाध्यक्ष अविनाश आंग्रे, रवींद्र गोवळकर, सचिव दिलीप घाग व इतर सदस्य उपस्थित होते. शासनाने या मागणीची तातडीने दखल न घेतल्यास न्यायालयीन याचिका (PIL) दाखल करण्याचा आणि लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

Total Visitor Counter

3388768
Share This Article