GRAMIN SEARCH BANNER

दावोस येथून राज्यात ३७ लाख २२ हजार ७८७ कोटींची गुंतवणूक; १९ लाख रोजगारनिर्मितीचा अंदाज – उदय सामंत

Gramin Varta
180 Views

रत्नागिरी : स्वित्झर्लंडमधील दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेतून राज्यात सुमारे ३७ लाख २२ हजार ७८७ कोटी रुपयांची विक्रमी गुंतवणूक झाली असून विविध कंपन्यांशी एकूण ५१ सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या गुंतवणुकीतून राज्यातील सुमारे १९ लाख तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

दावोस दौऱ्यावर असलेले उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी पत्रकारांशी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, यावर्षी मागील वर्षाचा विक्रम मोडीत काढत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक राज्यात आली आहे. अद्याप एक दिवस शिल्लक असून आणखी करार होण्याची शक्यता आहे.

या गुंतवणुकीत कोकण विभागात सुमारे ३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून रत्नागिरी जिल्ह्यात सोलर प्रकल्प आणि ग्लास फॅक्टरीसंदर्भात करार करण्यात आले आहेत. तसेच नाशिक, छत्रपती संभाजीनगर, एमआयडीसी, एमएमआरडीए, सिडको आदी भागांतही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. याचा राज्याला मोठा आर्थिक फायदा होऊन रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे.

दावोस येथे केवळ सामंजस्य करार होतात, प्रत्यक्ष गुंतवणूक होत नाही, या विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना सामंत म्हणाले की, मागील वर्षी झालेले करार प्रत्यक्षात अमलात आले असून प्रकल्प सुरू झाले आहेत. याची माहिती विरोधकांनी घ्यावी. जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवण्याकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी दावोस दौऱ्याला ‘तीन दिवसांचे पिकनिक’ असे संबोधल्याच्या टीकेवर सामंत म्हणाले की, ते सत्तेत असताना देखील दावोस दौरे झाले होते. तेव्हाचे दौरेही पिकनिक होते का, याचे उत्तर त्यांनी द्यावे.

महापौर पदाबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री निर्णय घेतील

मुंबईसह इतर महानगरपालिकांमध्ये शिवसेना आणि भाजपने एकत्रितपणे निवडणुका लढवून विजय मिळवला आहे. त्यामुळे महापौरपद कुणाकडे राहील, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच अंतिम निर्णय घेतील, असे उदय सामंत यांनी सांगितले. दावोस दौऱ्यात मुख्यमंत्री आणि आपल्यात केवळ उद्योगविषयक चर्चा झाली असून कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Total Visitor Counter

3376313
Share This Article