GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : काजरघाटी येथे जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाकडून कुदळीच्या दांड्याने प्राणघातक हल्ला

Gramin Varta
699 Views


रत्नागिरी:शहरातील काजरघाटी चव्हाणवाडी येथे जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाने आपल्या मुलाच्या मदतीने मोठ्या भावावर कुदळीच्या दांड्याने भीषण हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हाणामारीत फिर्यादी, त्यांचा मुलगा आणि सात महिन्यांची गरोदर असलेली सून जखमी झाली असून, याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश सिताराम चव्हाण यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दिली असून, पोलिसांनी गुरुनाथ सिताराम चव्हाण आणि त्रिनेत्र गुरुनाथ चव्हाण यांच्यावर भारतीय दंड संहिता २०२३ च्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काजरघाटी चव्हाणवाडी येथील अंगणातील एका जागेवरून चव्हाण कुटुंबात वाद सुरू आहे. २८ मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास आरोपी गुरुनाथ चव्हाण आणि त्यांचा मुलगा त्रिनेत्र चव्हाण हे वादग्रस्त जागेत काँक्रीट घालत होते. यावेळी फिर्यादी सुरेश चव्हाण यांनी या कामाला विरोध केला असता, त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. या वादाचे रूपांतर नंतर हिंसक हाणामारीत झाले. संतापलेल्या गुरुनाथ चव्हाण याने हातातील कुदळीच्या लोखंडी पाईपच्या दांड्याने सुरेश चव्हाण यांच्या उजव्या हातावर, पाठीवर, कंबरेवर आणि डाव्या बाहूवर सपासप वार केले. इतक्यावरच न थांबता दोन्ही आरोपींनी सुरेश चव्हाण यांना जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

यावेळी सुरेश यांचा मुलगा सुमित मध्यस्थी करण्यासाठी धावला असता, आरोपी त्रिनेत्र चव्हाण याने त्याला शिवीगाळ करत मारहाण केली. या धक्काबुक्कीत सुमित हा गडग्यावरून खाली कोसळल्याने त्याच्या पाठीला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. आपल्या पतीला वाचवण्यासाठी सुमितची सात महिन्यांची गरोदर पत्नी स्पृहा चव्हाण तेथे आली असता, त्रिनेत्र चव्हाण याच्या हातातील कुदळीचा दांडा तिच्या पोटाला लागला. एका किरकोळ जमिनीच्या वादातून गरोदर महिलेलाही न जुमानता करण्यात आलेल्या या कृत्यामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून जखमींवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

3388263
Share This Article