GRAMIN SEARCH BANNER

व्यसनमुक्तीसाठी नाणीजला आलेल्या कोल्हापूरच्या प्रौढाचा आकस्मिक मृत्यू

Gramin Varta
202 Views

रत्नागिरी: व्यसनमुक्तीसाठी कोल्हापूरहून नाणीज येथे आणलेल्या एका ५० वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उत्तम आण्णाप्पा आवळेकर (वय ५०, रा. लिंगणूर कापसी, ता. कागल, जि. कोल्हापूर) असे मृत व्यक्तीचे नाव असून, याप्रकरणी पाली पोलीस दूरक्षेत्रात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उत्तम आवळेकर यांना दारूचे व्यसन होते. त्यांचे हे व्यसन सोडवण्यासाठी त्यांची आई शांताबाई आवळेकर आणि नातेवाईकांनी त्यांना नाणीज येथील व्यसनमुक्ती केंद्रात आणण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार २८ मार्च २०२६ रोजी रात्री १० वाजता कोल्हापूरहून निघून ते २९ मार्च रोजी पहाटे २.३० वाजता नाणीज येथे पोहोचले होते. सकाळी नाश्ता केल्यानंतर त्यांना व्यसनमुक्ती केंद्रामध्ये दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. मात्र, दुपारी २ वाजेच्या सुमारास त्यांना अचानक फिट आल्याने नातेवाईकांनी त्यांना तातडीने नाणीज येथील दवाखान्यात नेले.

तेथून अधिक उपचारासाठी त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय पाली येथे हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयात उपचार सुरू असतानाच सायंकाळी ५.१८ वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दखल घेतली असून, ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ नुसार आकस्मिक मृत्यू क्रमांक २४/२०२६ आणि पाली दूरक्षेत्र अकरन्स रजिस्टर क्रमांक ३७/२६ अन्वये नोंद करण्यात आली आहे. या घटनेने आवळेकर कुटुंबावर शोककळा पसरली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3391843
Share This Article