GRAMIN SEARCH BANNER

पोकलेन मशीनच्या साडेतीन लाखांच्या रॉक ब्रेकरचा अपहार; संगमेश्वरमध्ये चालकाविरुद्ध गुन्हा

Gramin Varta
203 Views

संगमेश्वर: तालुक्यातील भिरकोंड येथे पोकलेन मशीनच्या चालकाने मालकाचा विश्वासघात करून साडेतीन लाख रुपये किमतीच्या रॉक ब्रेकरची अप्रामाणिकपणे विल्हेवाट लावून पलायन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कोल्हापूर येथील उद्योजक संजय नामदेव नाळे (वय ४८) यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी संशयित आरोपी चालक विकास कुमार मळ (रा. गोपालगंज, बिहार) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय नाळे यांचा पोकलेन मशिनरीचा व्यवसाय असून त्यांनी आरोपी विकास याला आपल्या पोकलेनवर चालक म्हणून नोकरीला ठेवले होते. २० मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ ते २१ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजेच्या दरम्यान भिरकोड येथील रस्त्यावर ही घटना घडली. फिर्यादी यांनी विश्वासाने चालवण्यासाठी दिलेल्या पोकलेन मशीनसोबत असलेला ३ लाख ५० हजार रुपये किमतीचा ‘ओरियन’ कंपनीचा रॉक ब्रेकर (एल २२० मॉडेल) आरोपीने लबाडीच्या इराद्याने गायब केला. ही बाब लक्षात आल्यानंतर नाळे यांनी संगमेश्वर पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३१६(४) अन्वये फौजदारी पात्र न्यासभंगाचा गुन्हा दाखल केला असून, बिहार येथील मूळ रहिवासी असलेल्या या फरार चालकाचा शोध सुरू केला आहे.

Total Visitor Counter

3391816
Share This Article