चिपळूण/प्रतिनिधी : तालुक्यातील आकले येथे एका खासगी कंपनीकडून बेकायदेशीरपणे जमिनीचा ताबा घेण्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील स्थानिक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनींची कोणतीही विक्री केलेली नसताना, वनविभागाचे नाव सांगून जमिनी बळकावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रकरणी आकले येथील महादेव भिकू गजमल, बारकू गंगाराम वनगे, जयवंत विठोबा वनगे, हनुमंत विठोबा जोशी, दत्ताराम सीताराम गोरखे आणि शंकर सोनू उदेग या सहा शेतकऱ्यांनी महसूल विभाग आणि शिरगाव पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली असून दोषी कंपनीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या शेतकऱ्यांच्या मालकीच्या गट क्र. ९०१, १०२३, ९१२, ९८९, ९१६, ९८७, १०००, ९८६, ९१० आणि ९८८ या जमिनींची पिढ्यानपिढ्या महसूल दप्तरी नोंद असून, आजवर या जमिनींचे कोणतेही संपादन झालेले नाही. तरीही ही जमीन वनविभागाकडे हस्तांतरित झाल्याची अफवा पंचक्रोशीत पसरवून, एक खासगी कंपनी स्थानिकांना हाताशी धरून जमिनीचे सीमांकन करत आहे. वास्तविक, अशा व्यवहारांसाठी विविध कायदेशीर कागदपत्रांची आवश्यकता असते, मात्र या शेतकऱ्यांनी कोणत्याही कागदपत्रावर स्वाक्षरी केलेली नाही. तरीही कंपनीकडून सुरू असलेल्या या बेकायदेशीर हालचालींमुळे शेतकऱ्यांच्या हक्कावर गदा येत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कंपनीची निवड शासनानेच केली असून ही कंपनी पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांकडून जमिनी खरेदी करत आहे. पुढील काळात शासन अधिसूचना प्रसिद्ध करून या जमिनींची अधिकृत खरेदी करणार असल्याचे समजते, ज्याला काही अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे. मात्र, सध्या सुरू असलेला ताबा घेण्याचा प्रकार आणि वनविभागाच्या नावाचा वापर करून केला जाणारा दबाव यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती आणि संतापाचे मिश्र वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी तिवरे भेंदवाडी येथील शेतकऱ्यांनीही अशाच प्रकारची तक्रार केली होती, त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले असून महसूल प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





