GRAMIN SEARCH BANNER

रामपूर येथे जळालेल्या हाडांच्या अवशेषांनी उघड केला मुंबईतील हत्याकांडाचा थरार; चिपळूण पोलिसांकडून २४ तासांत आरोपींना बेड्या

Gramin Varta
1.9k Views

चिपळूण: तालुक्यातील रामपूर येथील आवटेवाडी परिसरात आंब्याच्या बागेत सापडलेल्या जळालेल्या मानवी अवशेषांनी मुंबईतील एका भीषण हत्याकांडाचा पर्दाफाश केला आहे. अवघ्या २४ तासांत या गुन्ह्याचा उलगडा करून चिपळूण पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी विशाल विजय खोडदेकर आणि त्याची मैत्रीण जन्नतुनिसा झिन्नत खान हिला अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून एजाज कुरेशी असे मृताचे नाव असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या गंभीर घटनेची सविस्तर माहिती पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. २८ मार्च रोजी रामपूर येथील डॉ. रावरणे यांनी त्यांच्या बागेजवळील दरीत काहीतरी संशयास्पद जळत असल्याचे आणि हाडांचे तुकडे विखुरलेले असल्याची माहिती दिली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले आणि मेंगडे यांनी पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता, तिथे हाडांच्या तुकड्यांसोबत अंगठी आणि इतर साहित्य सापडले.

फॉरेन्सिक पथक आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हे मानवी अवशेष असल्याचे स्पष्ट केल्याने खुनाचा संशय बळावला. यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने तपास चक्रे फिरवून ३१ मार्च रोजी पहाटे गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे घटनास्थळाची जागा विशाल खोडदेकर याच्या मालकीची असल्याचे समोर आले. संशयित विशाल गेल्या चार महिन्यांपासून फरार होता आणि मालाड पोलीसही त्याच्या शोधात असल्याची माहिती मिळताच संशयाची सुई त्याच्याकडे वळली. पोलिसांनी शोधमोहीम राबवून ३१ मार्चच्या रात्री विशालला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. जन्नतुनिसा खान हिने एजाज कुरेशी यांना एका सदनिकेसाठी डिपॉझिट दिले होते, मात्र ते परत देण्यास कुरेशी टाळाटाळ करत होते. या आर्थिक वादातून विशाल आणि जन्नतुनिसा यांनी मुंबईत कुरेशी यांना बेदम मारहाण केली, ज्यात त्यांचा मृत्यू झाला.

या धक्कादायक कृत्यानंतर दोघांनी मृतदेह एका बॅगेत भरून चिपळूणला आणला आणि विशालच्या बागेत पुरला. मात्र, काही दिवसांनी वन्य प्राण्यांनी ही बॅग बाहेर काढल्याचे विशालच्या लक्षात आले. पुरावा पूर्णपणे नष्ट करण्यासाठी त्याने ते अवशेष डिझेल ओतून जाळले. चिपळूण पोलिसांनी अत्यंत कौशल्याने या गुन्ह्याचा छडा लावून जन्नतुनिसा हिलाही १ एप्रिल रोजी अटक केली. न्यायालयाने दोन्ही आरोपींना ६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, या कामगिरीबद्दल पोलीस प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Total Visitor Counter

3391726
Share This Article