GRAMIN SEARCH BANNER

जागतिक ऑटिझम जागरूकता दिनानिमित्त ‘आस्था’ सोशल फाउंडेशनतर्फे रत्नागिरी बस स्थानकावर जनजागृती

रत्नागिरी: जागतिक स्वमग्नता जागरूकता दिवसाचे औचित्य साधून आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरी या संस्थेच्या वतीने रत्नागिरी बस स्थानक परिसरात विशेष जनजागृती उपक्रम राबवण्यात आला. ऑटिझम म्हणजेच स्वमग्नता म्हणजे नेमके काय, हे सर्वसामान्यांना सोप्या भाषेत आणि चित्रांच्या माध्यमातून समजावे यासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष पोस्टर्सचे उद्घाटन कुमार आल्हाद सुरेखा पाथरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऑटिझम असलेल्या मुलांचा समाजाने स्वीकार करून त्यांना प्रेम व आधार देण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

यावेळी आस्थाच्या सचिव सुरेखा पाथरे यांनी उपस्थित नागरिकांना ऑटिझमच्या लक्षणांची सविस्तर माहिती दिली. जर एखादे मूल खूप चंचल असेल, वयानुरूप बोलत नसेल, स्वतःमध्येच मग्न राहत असेल किंवा इतर मुलांमध्ये मिसळत नसेल, तर पालकांनी तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. पालकांनी मुलांमधील या लक्षणांकडे वेळीच लक्ष देऊन लवकर थेरपी उपचार सुरू केल्यास, अशा मुलांना वयानुरूप वाढ आणि विकासाचे टप्पे गाठणे सहज शक्य होते, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. अशा बालकांसाठी आस्था संस्थेमध्ये सर्व प्रकारचे सल्ला, समुपदेशन आणि थेरपी उपचार उपलब्ध असून जिल्हा शासकीय रुग्णालयातील डीईआयसी केंद्रातही या सेवा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली.

या जनजागृती मोहिमेत सामाजिक कार्यकर्त्या विजेता मोर्ये यांच्यासह आस्थाच्या कार्यकर्त्यांनी बस स्थानक आणि परिसरात माहिती पत्रकांचे वितरण करून प्रवाशांशी संवाद साधला. मुलांच्या विकासासाठी पालकांचा पुढाकार आणि समाजाचा सकारात्मक दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या उपक्रमात संस्थेच्या हेल्प लाईन जिल्हा समन्वयक संकेत चाळके, थेरपी सेंटर प्रमुख संपदा कांबळे, विविध कार्यकर्ते, पालक आणि मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Total Visitor Counter

3399797
Share This Article