GRAMIN SEARCH BANNER

ब्रेकिंग: मिरकरवाड्यात आगीचे तांडव; नगरसेवक सोहेल साखरकर यांच्यासह स्थानिक तरुणांच्या धाडसामुळे मोठी जीवितहानी टळली

रत्नागिरी: रत्नागिरीतील प्रसिद्ध मत्स्यव्यवसायाचे केंद्र असलेल्या मिरकरवाडा परिसरात काल रात्री ११ च्या सुमारास भीषण आगीचे तांडव पाहायला मिळाले. ज्या ठिकाणी मासे साठवणूक, सुकवणे आणि मासेमारीची साधने ठेवली जातात, अशा महत्त्वाच्या केंद्राला अचानक आग लागली. रात्रीच्या शांततेत लागलेल्या या आगीने बघता बघता रौद्र रूप धारण केले होते. मात्र, जीवितहानी टळली असली तरी मच्छिमारांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. या संकटकाळात स्थानिक तरुण आणि लोकप्रतिनिधींनी दाखवलेल्या धैर्यामुळे एका मोठ्या अनर्थाला रोखण्यात यश आले आहे.

आगीची भीषणता लक्षात येताच परिसरातील तरुणांनी आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. नगरपालिकेचे अग्निशामक दल पोहोचण्यापूर्वीच पाणी सभापती निलेश नायर आणि नगरसेवक सोहेल साखरकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या फळीसह तातडीने मदतकार्य सुरू केले. यामध्ये ताबिश साखरकर, हंजला साखरकर, समद मिरकर, मतीन मजगावकर, जाकीर, आसरा, सोहेल, नसीर, अब्दुल बहर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जीवाचे रान करून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मेहनत घेतली. आगीच्या ज्वाळांसमोर उभे राहून या तरुणांनी दाखवलेली जिद्द पाहून उपस्थित नागरिकांनी त्यांचे मनापासून आभार मानले.

या संपूर्ण मदतकार्यात नगरसेवक सोहेल साखरकर यांच्या धाडसाची विशेष चर्चा सध्या मिरकरवाडा परिसरात सुरू आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रत्यक्ष आगीत उतरून त्यांनी केलेल्या कामाचे सर्वांकडून कौतुक होत आहे. त्यांच्या आणि त्यांच्या टीमच्या परिश्रमांमुळेच आगीचा प्रसार अधिक वाढण्यापासून रोखता आला. या आगीत मासेमारीची साधने आणि साठवलेल्या मासळीचे नुकसान झाल्याने मच्छिमारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असले, तरी संकटसमयी राजकारण बाजूला ठेवून धावून आलेल्या लोकप्रतिनिधींमुळे आणि तरुणांच्या एकजुटीमुळे माणुसकीचे दर्शन घडले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Total Visitor Counter

3475113
Share This Article