रत्नागिरी: रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून आणि दूरदृष्टीतून विकसित करण्यात आलेल्या ‘RAIDS App’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा मोठा फायदा आता राज्यातील इतर जिल्ह्यांनाही होऊ लागला आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने नागपूर जिल्हा पोलिसांनी एका अत्यंत आव्हानात्मक प्रकरणात अवघ्या दोन तासांत अज्ञात मृतदेहाची ओळख पटवण्यात यश मिळवले आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि पोलिसांचा समन्वय यामुळे तपास प्रक्रियेला किती वेग येऊ शकतो, याचे हे एक उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका जंगलमय परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची स्थिती आणि परिसराचा विचार करता या व्यक्तीची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. अशा वेळी नागपूर पोलिसांनी रत्नागिरी पोलिसांशी संपर्क साधून समन्वय साधला. रत्नागिरी पोलिसांनी विकसित केलेल्या ‘RAIDS App’ या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने मृत व्यक्तीच्या चेहऱ्याचे डिजिटल पुनर्निर्माण (Photo Reconstruction) करण्यात आले. या तांत्रिक प्रक्रियेमुळे मृतदेहाचा चेहरा स्पष्ट झाला आणि अवघ्या दोन तासांच्या आत त्या व्यक्तीची ओळख पटली.
तपासात निष्पन्न झाल्याप्रमाणे, सदर मृत व्यक्ती ही दौलामेटी, आठवा मैल, नागपूर येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सुरू केलेला हा नाविन्यपूर्ण उपक्रम केवळ गुन्हे तपासातच नव्हे, तर बेवारस मृतदेहांची ओळख पटवण्यासाठीही संजीवनी ठरत आहे. या यशस्वी कामगिरीमुळे पोलीस दलात ‘RAIDS App’च्या कार्यक्षमतेची चर्चा होत असून, नागपूर पोलिसांनी या तांत्रिक मदतीबद्दल रत्नागिरी पोलिसांचे आभार मानले आहेत. या कारवाईमुळे तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर गुंतागुंतीचे गुन्हे सोडवण्यासाठी किती महत्त्वाचा आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.







