GRAMIN SEARCH BANNER

साखरप्याची लेक तन्वी कोलते ‘बिग बॉस’च्या घरात; कोकणच्या कन्येला विजयी करण्याचे रत्नागिरीकरांना आवाहन

saurabhsalvi26@gmail.com
1.2k Views

रत्नागिरी: कलर्स मराठीवरील बहुचर्चित ‘बिग बॉस मराठी’ या रियालिटी शोमध्ये रत्नागिरीची कन्या तन्वी कोलते हिने आपल्या दमदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, आता तिला विजेतेपदापर्यंत पोहोचवण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून पाठिंबा मिळत आहे. साखरपा परिसरातील मूळ रहिवासी असलेल्या तन्वीने या शोमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे आणि धीरोदात्तपणे आपला खेळ मांडला आहे. प्रत्येक टास्कमध्ये दाखवलेला आत्मविश्वास, कठीण प्रसंगात घेतलेली स्पष्ट भूमिका आणि स्वभावातील साधेपणा यामुळे तिने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. रत्नागिरीच्या या गुणी मुलीने आपल्या कर्तृत्वाने जिल्ह्याची शान वाढवली असून, आता तिला अंतिम टप्प्यात विजयी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदानाचे आवाहन स्थानिक स्तरावरून केले जात आहे.

‘आपली मुलगी, आपला अभिमान’ अशा भावना व्यक्त करत सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तन्वीला पाठिंबा देण्याचे वारे वाहत आहेत. दररोज रात्री ८ वाजता कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टारवर प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात तन्वीचा प्रवास कौतुकास्पद ठरत आहे. रत्नागिरीच्या मातीतील एक कलाकार इतक्या मोठ्या व्यासपीठावर आपल्या कौशल्याने ठसा उमटवत असताना, तिला सर्व रत्नागिरीकरांनी आणि कोकणवासियांनी जास्तीत जास्त मतदान करून साथ द्यावी, अशी विनंती ग्रामीण वार्ता सह विविध स्तरांतील चाहत्यांकडून करण्यात येत आहे. तन्वीला मिळणाऱ्या या उदंड प्रतिसादामुळे ती ‘बिग बॉस’च्या घराची विजेती ठरेल, असा विश्वास आता व्यक्त केला जात आहे.

Total Visitor Counter

3485115
Share This Article