दापोली : तालुक्यातील हर्णे बंदर मोहल्ला येथील ऐतिहासिक गोवा किल्ल्यावर एका जुन्या वादाच्या व्हिडिओवरून दोन तरुणांवर लोखंडी सळई आणि लाथाबुक्क्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात पाच नामजद आरोपींसह इतर १० ते १२ जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २७ मे २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला असून, या हाणामारीत पाजपंढरी येथील महेंद्र हरिश्चंद्र रघुवीर (वय २८) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी चिन्मय सचिर गुरव (वय २३, व्यवसाय- मर्दानी खेळ प्रशिक्षक, रा. हर्णे गुरववाडी) याने गुरुवारी २८ मे रोजी पहाटे दापोली पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी चिन्मय गुरव आणि त्याचा मित्र महेंद्र रघुवीर हे दोघे नेहमीप्रमाणे सायंकाळी हर्णे येथील गोवा किल्ल्यावर फेरफटका मारण्यासाठी गेले होते. ते दोघे किल्ल्याच्या बुरुजावर बसलेले असताना, त्या ठिकाणी शेळ्या-बकऱ्या चरवण्यासाठी आलेले आरोपी जेन अस्लम हुनैरकर (वय २२), मूफिज जावेद सोलकर (वय २३), सलाह हसन किडविलकर (वय १९), नबिल निसार काझी (वय १९) आणि जैब ताजुद्दीन जमादार (वय २०, सर्व रा. हर्णे बंदर मोहल्ला) हे तिथे पोहोचले. ‘तू काल घडलेल्या घटनेचा व्हिडिओ व्हॉट्सॲप ग्रुपवर का टाकलास?’ अशी विचारणा करत आरोपींनी चिन्मय आणि महेंद्र यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.
हा वाद इतका विकोपाला गेला की आरोपींनी रागाच्या भरात दोघांनाही अश्लील शिवीगाळ करत हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली.
एवढ्यावरच न थांबता आरोपी जेन हुनैरकर आणि मूफिज सोलकर यांनी किल्ल्यातच पडलेली एक लोखंडी शिग (सळई) उचलून चिन्मय व महेंद्र यांच्यावर सपासप वार करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी किल्ल्यात बकऱ्या चारणाऱ्या इतर १० ते १५ मुलांनीही आरोपींच्या सोबतीने या दोघांना घेरून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या भीषण हल्ल्यात फिर्यादी चिन्मयच्या उजव्या डोळ्याच्या भिवईवर, हाताला व पायाला दुखापत झाली आहे, तर गंभीर जखमी झालेला महेंद्र याच्या तोंडावर, हातापायावर, पाठीत आणि डोक्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत.
या घटनेनंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून दापोली पोलिसांनी या प्रकरणी तत्परता दाखवत आरोपींविरुद्ध गुन्हा रजि. नंबर १०९/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता (BNS) अधिनियम २०२३ चे कलम १०९ (खुनाचा प्रयत्न), १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, ११५(२), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या गंभीर गुन्ह्याचा पुढील तपास दापोली पोलीस करत असून, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळ असलेल्या किल्ल्यावर अशा प्रकारे हिंसक घटना घडल्याने स्थानिक नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे.






