GRAMIN SEARCH BANNER

खेडमध्ये भारतीय जनता पार्टीचा ४६ वा स्थापना दिन उत्साहात साजरा; बाईक रॅलीने वेधले शहराचे लक्ष

Gramin Varta
95 Views

खेड: भारतीय जनता पार्टीच्या ४६ व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून खेड शहरात भाजपाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करत हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ६ एप्रिल १९८० रोजी स्थापना झालेल्या या पक्षाने आज जगातील सर्वात मोठे राजकीय संघटन म्हणून ओळख निर्माण केली असून, याच प्रवासाचा गौरव आज स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला.

खेड शहरातील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाचा ध्वज फडकवण्यात आला. ध्वजारोहणानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता. या आनंदोत्सवाप्रसंगी पेढे वाटप करून एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानंतर शहरातून भव्य बाईक रॅली काढण्यात आली, ज्याने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी वैभव खेडेकर यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सांगितले की, कोट्यवधी कार्यकर्त्यांचा त्याग, समर्पण आणि निष्ठेमुळेच भाजपाचा हा वटवृक्ष आज उभा आहे.

या कार्यक्रमाला भाजपा खेड शहर अध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा अल्पसंख्याक रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहीम सहिबोले, नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, नगरसेविका स्वप्नाली राकेश चव्हाण, युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, वैजेश सागवेकर, पांडुरंग पाष्टे, भाजपा अल्पसंख्यांक सेल खेड शहर अध्यक्ष नईम चौगुले, प्रीती चिखले, भरत कार्ले, मृत्युंजय मोडक, राहुल प्रभु, विजय पवार, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, विजय गुप्ता, प्रदीप भोसले, प्रशांत बारटक्के, ओवैस चौगुले यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. स्थापना दिनानिमित्त आयोजित या उपक्रमांमुळे खेडमधील राजकीय वातावरण भाजपामय झाल्याचे पाहायला मिळाले.

Total Visitor Counter

3259809
Share This Article