GRAMIN SEARCH BANNER

साखरप्याची लेक तन्वी कोलते ‘तिकीट टू फिनाले’ जिंकत ‘बिग बॉस’च्या अंतिम फेरीत

रत्नागिरी: कलर्स मराठी वाहिनीवरील गाजणाऱ्या ‘बिग बॉस मराठी’ सीझन ६ च्या घरात रत्नागिरीची सुकन्या तन्वी कोलते हिने आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर ‘तिकीट टू फिनाले’ जिंकून अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. या विजयामुळे तन्वी या पर्वाची पहिली फायनलिस्ट ठरली असून, तिच्या या यशाने संपूर्ण कोकणसह रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. मूळची साखरपा परिसरातील असलेली तन्वी या शोमध्ये सुरुवातीपासूनच चर्चेत राहिली आहे. प्रत्येक कार्यात तिने दाखवलेला जिद्दी स्वभाव, कठीण प्रसंगात घेतलेली ठाम भूमिका आणि संयमी खेळ यामुळे तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिने केवळ स्वतःचा खेळच सिद्ध केला नाही, तर आपल्या साध्या आणि स्पष्टवक्त्या स्वभावाने कोकणच्या मातीचा गुण सर्व महाराष्ट्रासमोर मांडला आहे.

तन्वीने अंतिम फेरीत धडक मारल्यानंतर आता तिला महाविजेती पाहण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘आपली मुलगी, आपला अभिमान’ या टॅगलाईनसह तिला पाठिंबा देणाऱ्या पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. रत्नागिरीतील स्थानिक संस्था आणि नागरिकांकडून तिला मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. ग्रामीण भागातील एका कन्येने इतक्या मोठ्या राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवल्यामुळे सर्व स्तरांतून तिचे कौतुक होत आहे. आता रत्नागिरीकर आणि संपूर्ण कोकणवासीय आपल्या या लाडक्या लेकीला जास्तीत जास्त मतदान करून विजेतेपदाचा करंडक कोकणात आणण्यासाठी सज्ज झाले आहेत. कलर्स मराठी आणि जिओ सिनेमाच्या माध्यमातून तन्वीच्या या प्रवासाला साथ देऊन तिला विजयी करावे, अशी विनंती तिच्या चाहत्यांकडून करण्यात येत आहे. तन्वीला मिळणारा हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, ती यंदाच्या पर्वाची महाविजेती ठरेल, असा दाट विश्वास रत्नागिरीकरांकडून व्यक्त होत आहे.

Total Visitor Counter

3484897
Share This Article