GRAMIN SEARCH BANNER

देवरुखमध्ये गॅससाठी रांगा लावण्याची कटकट संपली; आता नागरिकांना मिळणार होम डिलिव्हरी

देवरुख: देवरुख शहर आणि तालुक्यातील गॅस ग्राहकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडरसाठी एजन्सीसमोर लागणाऱ्या लांबलचक रांगा आणि त्यामुळे नागरिकांची होणारी ओढाताण आता कायमची थांबणार आहे. भाजप, महायुतीचे पदाधिकारी, देवरुख नगराध्यक्षा आणि नगरसेवकांनी एचपी गॅस एजन्सीवर धडक देत केलेल्या आक्रमक आणि यशस्वी चर्चेनंतर आता तालुक्यातील सर्व नागरिकांना त्यांच्या ऑनलाइन नोंदणीनुसार घरपोच सिलेंडर सेवा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

देवरुख येथील गॅस एजन्सीच्या कार्यालयात किंवा गोडाऊनवर नागरिकांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागत असल्याने जनतेमध्ये मोठा असंतोष होता. ही समस्या लक्षात घेऊन स्थानिक लोकप्रतिनिधींनी काल गॅस एजन्सी मालकांशी सविस्तर चर्चा केली. या चर्चेअंती देवरुखमधील कार्यालयातून दिले जाणारे सिलेंडर वितरण पूर्णपणे बंद करून केवळ ऑनलाइन बुकिंगनुसार ९९ टक्के घरपोच सेवा देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली असून देवरुख आणि साडवली परिसरात घरपोच सिलेंडर पोहोचवण्यास सुरुवात झाली आहे.

त्यामुळे नागरिकांनी आता गॅस एजन्सीमध्ये जाऊन रांगेत उभे न राहता ऑनलाइन पद्धतीने बुकिंग करावे, असे आवाहन लोकप्रतिनिधींकडून करण्यात आले आहे. दरम्यान, सध्याच्या जागतिक परिस्थितीमुळे आणि इराण-अमेरिका युद्धाच्या परिणामामुळे गॅस वितरणाचा ओघ काहीसा कमी असल्याने सिलेंडर मिळण्यास थोडा विलंब होऊ शकतो, तरी नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून संयम बाळगावा असेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे.

Total Visitor Counter

3447374
Share This Article