GRAMIN SEARCH BANNER

खेड तालुक्यातील बिजघरचा सुजल भोसले एनडीए परीक्षेत भारतात १३९ वा

Gramin Varta
37 Views

खेड: खेड तालुक्यातील बिजघर गावातील सुजल भोसले याने ‘एनडीए’ आणि ‘नव्हल अकॅडमी २०२५’ च्या परीक्षेत देदीप्यमान यश संपादन करत भारतीय सैन्यदलात अधिकारी होण्याचे स्वप्न सत्यात उतरवले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (UPSC) घेण्यात आलेल्या या अत्यंत कठीण परीक्षेत सुजलने देशातून १३९ वा क्रमांक (रँक) पटकावला असून, त्याच्या या यशामुळे संपूर्ण कोकणात अभिमानाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेच्या (SPI) ज्या २१ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळवले, त्यामध्ये सुजलने आपल्या जिद्दीच्या जोरावर मानाचे स्थान मिळवले आहे.

सुजलचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी असून त्याला सैन्यदलाचा वारसा आपल्या कुटुंबातूनच मिळाला आहे. त्याचे आजोबा कॅप्टन राजारामराव भोसले हे सैन्य दलातून निवृत्त झाले असल्याने, लहानपणापासूनच सुजलच्या डोळ्यासमोर खाकी वर्दीचे स्वप्न होते. खेड येथील रोटरी स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण घेतलेल्या सुजलने दहावीच्या सीबीएसई बोर्ड परीक्षेत ९७ टक्के गुण मिळवून आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेची चुणूक दाखवली होती. पुढील शिक्षणासाठी त्याने ‘एसपीआय’ या नामांकित संस्थेत प्रवेश मिळवला आणि तिथे अकरावी-बारावीचे शिक्षण घेतानाच एनडीएची तयारी सुरू केली.

सुरुवातीच्या दोन प्रयत्नांत मुलाखतीच्या टप्प्यावर अपयश आले तरी खचून न जाता, पुणे येथे इंजिनीअरिंगच्या पहिल्या वर्षात शिकत असताना त्याने तिसऱ्या प्रयत्नात हे ऐतिहासिक यश साध्य केले.
जुलै २०२६ पासून सुरू होणाऱ्या एनडीएच्या १५६ व्या तुकडीसाठी सुजलची निवड झाली असून, तो आता भारतीय लष्करात अधिकारी म्हणून दाखल होणार आहे. रत्नागिरीसारख्या ग्रामीण भागात जिथे मोठ्या शैक्षणिक सुविधांचा आजही अभाव आहे, अशा ठिकाणच्या एका सामान्य कुटुंबातील मुलाने देशाच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवणे ही बाब कौतुकास्पद ठरत आहे. सुजलचे वडील ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करतात, तर आई आरोग्य केंद्रात कार्यरत आहेत; आपल्या मुलाने घेतलेल्या कष्टाचे चीज झाल्याने त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले आहेत. सुजलने मिळवलेले हे यश केवळ बिजघर गावासाठीच नव्हे, तर सैन्यदलात करिअर करू इच्छिणाऱ्या कोकणातील हजारो विद्यार्थ्यांसाठी एक दीपस्तंभ ठरणार आहे.

Total Visitor Counter

3283875
Share This Article