GRAMIN SEARCH BANNER

अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू; राज्यातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्याची संधी

Gramin Varta
46 Views

पुणे : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे राज्यात शैक्षणिक वर्ष २०२६-२७मध्ये अकरावीतील प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना १० एप्रिलपासून ऑनलाइन प्रवेश अर्ज भरता येणार आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी या बाबतची माहिती दिली. यंदा दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत घेण्यात आली. यंदा राज्यातील १६ लाख १५ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना दहावीचा निकाल आणि अकरावी प्रवेश प्रक्रियेचे वेध लागले आहेत.

या पार्श्वभूमीवर, अकरावीची प्रवेश प्रक्रिया वेळेत सुरू होण्याच्या दृष्टीने आता विद्यार्थी नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यात विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग एक भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, तर अर्जाचा भाग दोन दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भरता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

गेल्या वर्षी प्रथमच शिक्षण विभागाने अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली होती. राज्यातील ९ हजार ५५१ कनिष्ठ महाविद्यालयातील एकूण २१ लाख ७८ हजार ७८ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली. त्यात केंद्रीभूत प्रवेशाद्वारे ११ लाख ७९ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी, कोटा प्रवेशाद्वारे १ लाख ७० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. तर ८ लाख २८ हजारांहून अधिक जागा रिक्त राहिल्या होत्या.

पहिल्यांदाच ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आल्याने निकाल जाहीर झाल्यानंतर नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. परिणामी, प्रवेश प्रक्रिया बराच काळ चालली होती. सुमारे अकरा प्रवेश फेऱ्या राबवण्यात आल्या होत्या. दहावीची परीक्षा सुरू असतानाच अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची माहिती देणारे, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवण्याबाबतच्या सूचना देणारे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर आता प्रत्यक्ष अर्ज भरण्याची सुविधा विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे.


विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंतची मुदत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शांतपणे प्रक्रिया समजून घेऊन, अचूकपणे अर्ज भरणे आवश्यक आहे. गेल्या वर्षी पहिल्यांदा राज्यव्यापी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्या प्रक्रियेत निदर्शनास आलेल्या त्रूटी दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. – डॉ. महेश पालकर, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक

Total Visitor Counter

3274814
Share This Article