धामणी परिसरात प्रवाशांचा संताप; शनिवारी रात्री चालक आणि चिमुकल्यांसह कुटुंब थोडक्यात बचावले
संगमेश्वर / एजाज पटेल : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी येथील हॉटेल ड्राइव्ह-इन समोर मृत्यूचे तांडव सुरूच आहे. गुरुवार आणि शुक्रवार अशा ४८ तासांत याच ठिकाणी ७ ते ८ भीषण अपघात झाल्याची बातमी प्रसिद्ध होऊनही महामार्ग ठेकेदार कंपनीला जाग आलेली नाही. ठेकेदाराच्या या निर्लज्ज आणि निगरगट्ट कारभारामुळे शनिवारी रात्री पुन्हा एका कुटुंबाचा जीव टांगणीला लागला. या ठिकाणी असलेल्या मातीच्या जीवघेण्या ढिगाऱ्यामुळे एका चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला असून सुदैवाने चालक आणि दोन लहान मुलांसह कुटुंब यातून थोडक्यात बचावले आहे.
गुरुवारी रात्रीपासून सुरू झालेली अपघातांची मालिका शनिवारीही कायम राहिली. शनिवारी रात्री एक चारचाकी वाहन महामार्गावरून जात असताना रस्ता बंद असल्याचे कोणतेही फलक किंवा रिफ्लेक्टर्स नसल्याने ज्या ठिकाणी आहेत ते रात्रीच्या अंधारात दिसत नसल्याने चालकाला समोरील मातीच्या ढिगाऱ्याचा अंदाज आला नाही. वेगात असलेले वाहन थेट त्या ढिगाऱ्यावरून हवेत उडाले आणि जोरात रस्त्यावर आदळले. ज्या वेळी हे वाहन हवेत उडून जमिनीवर आपटले त्या वेळी आतील दोन लहान मुले आणि त्यांच्या पालकांच्या काळजाचा ठोका चुकला असेल. या अपघातात वाहनाचे प्रचंड नुकसान झाले असून दैवा बलवत्तर म्हणून कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र या धक्कादायक अनुभवामुळे हे कुटुंब पूर्णपणे हादरून गेले आहे.
सलग दोन दिवस अपघात होऊनही आणि प्रसारमाध्यमांनी धोक्याची घंटा वाजवूनही महामार्ग ठेकेदाराने तो जीवघेणा मातीचा ढिगारा बाजूला करण्याचे सौजन्य दाखवले नाही. या ठिकाणी साधे बॅरिकेड्स किंवा रात्री चमकणारे रेडियम लावण्याची तसदीही कंत्राटदाराने घेतलेली नाही. ठेकेदाराने रस्ता बनवण्याचा ठेका घेतला आहे की लोकांच्या जीवाचा असा जळजळीत सवाल आता वाहनचालक विचारत आहेत. प्रवाशांमधून कंत्राटदार कंपनीच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून लोकांच्या मनात ठेकेदाराबद्दल प्रचंड रोष उफाळून येत आहे.
एकाच ठिकाणी सलग तीन रात्री अपघात होणे ही साधी बाब नाही. गुरुवारी महागड्या गाडीचा चक्काचूर झाला, शुक्रवारी रुग्णवाहिका अडकली आणि शनिवारी लहान मुलांसह असलेले कुटुंब मृत्यूच्या दारातून परत आले. तीन दिवसात पाच ते सहा दुचाकी अपघात इतके अनर्थ घडूनही प्रशासन गप्प का असा प्रश्न उपस्थित होत आहे. ठेकेदाराच्या या निष्काळीपणामुळे उद्या जर कोणाचा बळी गेला तर त्याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल संगमेश्वर तालुक्यातील जनता विचारत आहे. या परिसरात रक्ताचा सडा पडण्याची ठेकेदार वाट पाहत आहे का अशी भावना आता प्रवाशांमध्ये निर्माण झाली असून संबंधित ठेकेदारावर तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे.






