रत्नागिरी: तोणदे येथील प्रसिद्ध आंबा व्यापारी रुपेश नागवेकर यांनी आपल्या राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण रत्नागिरी शहर आणि व्यापारी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हापूस आंबा व्यापारात आपला वेगळा ठसा उमटवणारे नागवेकर हे हापूस रिसॉर्टचे मालक असलेल्या नागवेकर कुटुंबातील मोठे बंधू होते. एक यशस्वी आणि सक्रिय व्यावसायिक म्हणून त्यांची ओळख होती.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना त्यांच्या निवासस्थानी घडली. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. नागवेकर यांच्या पश्चात पत्नी, मुले आणि भाऊ असा मोठा परिवार असून, त्यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गेल्या काही काळापासून ते आजारपण आणि आर्थिक विवंचनेमुळे मानसिक तणावाखाली असावेत, अशी प्राथमिक चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
रुपेश नागवेकर हे आपल्या मनमिळावू आणि हसमुख स्वभावासाठी परिचित होते. त्यांच्या अशा टोकाच्या निर्णयामुळे मित्रपरिवार आणि स्थानिक नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणाचा पोलीस सर्व बाजूंनी सखोल तपास करत असून, अधिकृत माहिती तपास पूर्ण झाल्यावरच समोर येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. सध्या तोणदे गावासह संपूर्ण रत्नागिरीत शोकमय वातावरण पसरले आहे.







