ठाणे: महापालिका निवडणुकीत “कैसे हराया” या एका वक्तव्यामुळे राज्यभरात चर्चेत आलेल्या एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांच्या अडचणीत आता मोठी भर पडली आहे.
ठाणे तहसीलदार उमेश पाटील यांनी सादर केलेल्या अहवालात सहर शेख यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचे समोर आले असून, या निष्कर्षामुळे त्यांचे नगरसेविका पद धोक्यात आले आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्यावर आणि त्यांच्या वडिलांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.
या प्रकरणाची सुरुवात अहमद सिद्दीकी यांनी केलेल्या तक्रारीपासून झाली होती. सहर शेख यांचे वडील युनुस शेख यांच्या जात प्रमाणपत्राच्या वैधतेवर त्यांनी आक्षेप घेतला होता. प्रशासनाने या तक्रारीची दखल घेत चौकशी सुरू केली आणि तहसीलदारांनी सादर केलेल्या अहवालात या तक्रारीत प्रथमदर्शनी तथ्य असल्याचे स्पष्ट झाले. तपासादरम्यान एक महत्त्वाची बाब समोर आली ती म्हणजे सहर शेख या मूळच्या उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील रहिवासी असल्याची नोंद आहे. त्यामुळे दुसऱ्या राज्यातील रहिवासी असताना महाराष्ट्रात आरक्षणाचा लाभ घेतल्याचा गंभीर ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, युनुस शेख हे गाझियाबाद येथील रहिवासी असून महाराष्ट्रात स्थलांतर केल्यानंतर त्यांना नियमानुसार ‘नमुना १०’ लागू होणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची दिशाभूल करत ‘नमुना ८’ चा वापर केल्याचा आरोप आहे. या प्रक्रियेतून त्यांनी महाराष्ट्रातील इतर मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसी प्रवर्गाचा बनावट दाखला मिळवला. याच दाखल्याच्या आधारे सहर शेख यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र मिळवले आणि ठाणे महानगरपालिका निवडणुकीत विजय मिळवला.
या प्रकरणातील प्रशासकीय सुनावणीतही अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. १८ मार्च रोजी होणारी सुनावणी युनुस शेख यांनी आजाराचे कारण देत टाळली होती. मात्र, २३ मार्च रोजी झालेल्या सुनावणीत तहसीलदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या. सर्वात मोठा प्रश्न असा उपस्थित केला जात आहे की, सहर शेख जर ठाण्याच्या रहिवासी होत्या, तर त्यांनी जातीचा दाखला मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून का घेतला? या मागे यंत्रणांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होता का, याची सखोल चौकशी सुरू आहे.
दरम्यान, तहसीलदार उमेश पाटील यांच्या अहवालानुसार, उपविभागीय जिल्हाधिकारी ठाणे तसेच कोकण विभाग जात पडताळणी समितीने सहर शेख आणि त्यांचे वडील युनुस शेख यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची आणि गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली आहे. जात प्रमाणपत्र मिळवताना कागदपत्रांमध्ये फेरफार किंवा चुकीची माहिती दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.या संपूर्ण प्रकरणामुळे ठाणे महापालिकेच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणात कायदेशीर घडामोडी वेगाने घडण्याची शक्यता आहे.
ठाणे : एमआयएम नगरसेविका सहर शेख अडचणीत; जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा अहवाल






