GRAMIN SEARCH BANNER

चिपळूणमध्ये ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत जनजागृती रॅली उत्साहात

चिपळूण : महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ या महत्त्वाकांक्षी अभियानाच्या पार्श्वभूमीवर चिपळूण तालुका आरोग्य विभागाच्या वतीने गुरुवारी सकाळी शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीला आरोग्य कर्मचारी, अशा सेविका, नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थी-विद्यार्थिनी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथून सुरू होऊन चिपळूण नगर परिषद परिसरापर्यंत काढण्यात आली. प्रारंभी श्रीफळ वाढवून अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी इकबाल चौगुले यांनी अभियानाविषयी प्रास्ताविक करत उद्दिष्टे स्पष्ट केली. त्यानंतर डॉ. ज्योती यादव यांनी ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, विविध आरोग्य सुविधा वाढविणे आणि प्रतिबंधात्मक उपायांवर भर देणे आवश्यक असल्याचे सांगितले.

कामथे उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन मदर यांनीही अभियानाची सविस्तर माहिती देत नागरिकांनी आरोग्य तपासण्या करून घ्याव्यात, असे आवाहन केले.

या प्रसंगी डॉ. अजय सानप, संजीवनी नर्सिंग कॉलेजचे जगदीश वाघुळदे, हर्षा वाघुळदे, आरोग्य पर्यवेक्षक आर. के. पवार, नारायण शिंगवा, मनोहर तायडे, विनायक हेगडे, काका चव्हाण, आरोग्य सहाय्यक एस. वाय. जानवलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

जनजागृती रॅलीमध्ये आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, तसेच संजीवनी नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आरोग्याबाबत जनजागृती करणारे फलक आणि घोषवाक्यांद्वारे नागरिकांना संदेश देण्यात आला.

दरम्यान, या अभियानांतर्गत कॅन्सर तपासणीसाठी विशेष व्हॅन विविध भागांत फिरत असून, या रॅलीमध्येही त्या व्हॅनचा सहभाग होता. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले.

ही रॅली शहरातील विविध मार्गांवरून काढण्यात आली असून नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यात या उपक्रमाला यश आले.

Total Visitor Counter

3485209
Share This Article