GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वर : कोळंबे भरणकरवाडी येथील बेपत्ता वृद्धेचा जंगलात आढळला मृतदेह

संगमेश्वर : तालुक्यातील कोळंबे भरणकरवाडी येथील गेल्या पंधरा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ७५ वर्षीय वृद्धेचा मृतदेह कोळंबे पूरक सडा येथील जंगलात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. द्रोपदी पांडुरंग पडवळ असे या मृत वृद्धेचे नाव असून, त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ३१ मार्च रोजी राहत्या घरातून बेपत्ता झालेल्या द्रोपदी पडवळ यांचा शोध घेताना गुरुवारी रात्री हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

मिळालेल्या माहितीनुसार, द्रोपदी पडवळ यांना विसरभोळेपणाचा आजार होता. याच आजारामुळे त्या ३१ मार्च २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजेच्या सुमारास कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेल्या होत्या. त्या वेळेत घरी न परतल्याने नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र त्या मिळून न आल्याने संगमेश्वर पोलीस ठाण्यात त्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थ गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचा शोध घेत होते. १६ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता कोळंबे पूरक सडा येथील जंगलमय भागात झाडीझुडपांमध्ये त्यांचा मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत स्थानिक शोध पथकाला आढळून आला.

या घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दुर्गम भागात आणि उन्हाच्या तीव्रतेमुळे मृतदेह ओळखण्यापलीकडे कुजला होता. पोलिसांनी या प्रकरणी बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून रात्री १०.३६ वाजता हे प्रकरण अधिकृतरीत्या दाखल करण्यात आले आहे. बेपत्ता असलेल्या वृद्धेचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने कोळंबे गावात शोककळा पसरली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

Total Visitor Counter

3468226
Share This Article