GRAMIN SEARCH BANNER

बापाच्या कष्टाचं सोनं! डिंगणीच्या वाहन चालकाची लेक तमन्ना मापारी झाली विज्ञान पदवीधर

संगमेश्वर/एजाज पटेल: नशिबाचे फेरे आणि गरिबीचे चटके सोसूनही जिद्दीच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते, हे डिंगणी येथील फरीद मापारी यांच्या कन्येने सिद्ध करून दाखवले आहे. प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी दोन हात करत तमन्ना फरीद मापारी हिने मुंबई विद्यापीठाची ‘विज्ञान स्नातक’ (B.Sc.) ही पदवी संपादन केली आहे. डिंगणीसारख्या ग्रामीण भागातून एका कष्टकरी वाहन चालकाच्या लेकीने घेतलेली ही झेप संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरली असून, तिच्या या यशामुळे गरिबीच्या छाताडावर विजयाचे नाव कोरले गेले आहे.

तमन्नाचे वडील फरीद मापारी हे व्यवसायाने वाहन चालक आहेत. दिवसभर गाडीचे स्टिअरिंग हातात धरून, ऊन-पावसाची तमा न बाळगता त्यांनी आपल्या लेकीच्या शिक्षणासाठी रक्ताचे पाणी केले. स्वतः सोसलेल्या कष्टाची झळ त्यांनी कधीही तमन्नाच्या स्वप्नांना बसू दिली नाही. त्यांच्या याच संघर्षाचे चीज नुकत्याच संगमेश्वर लोवले येथील नवनिर्माण सिनिअर कॉलेजमध्ये पार पडलेल्या दीक्षांत समारंभात पाहायला मिळाले. पदवीधराचा तो मानाचा काळा गाऊन आणि डोक्यावर विजयाची टोपी चढवून जेव्हा तमन्ना व्यासपीठावर आली, तेव्हा उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले. हा सन्मान तिला संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये, मुंबई विद्यापीठ रत्नागिरी सब कॅम्पसचे डॉ. पांडुरंग पाटील, डॉ. संजना चव्हाण आणि डॉ. प्रज्ञा कदम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

प्रमाणपत्र स्वीकारताना तमन्ना अत्यंत भावूक झाली होती. तिने आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय वडिलांच्या कष्टाला आणि आईच्या खंबीर साथिला दिले. “वडिलांनी रक्ताचे पाणी करून माझ्या शिक्षणात कधीही खंड पडू दिला नाही, ही पदवी त्यांच्या घामाच्या प्रत्येक थेंबाला समर्पित आहे,” अशी कृतज्ञता तिने यावेळी व्यक्त केली. तर दुसरीकडे, आपल्या लेकीला पदवीधराच्या वेषात पाहून फरीद मापारी यांनाही आनंदाश्रू अनावर झाले. “आज माझं स्टिअरिंगवरचं आयुष्य सार्थकी लागलं,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. कसबा जुनिअर कॉलेजमधून प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेल्या तमन्नाच्या या यशाबद्दल डिंगणी परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, ती ग्रामीण भागातील मुलींसाठी एक नवी प्रेरणा ठरली आहे.

Total Visitor Counter

3485589
Share This Article