चिपळूण (प्रतिनिधी) : येथील नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे महाविद्यालयातील रोजगार व प्लेसमेंट सेलतर्फे अभिमानास्पद अशी कामगिरी नोंदविण्यात आली असून महाविद्यालयातील साहिल नलावडे (TYIT), मरवान दलवाई (TYBT), मयूरेश सावंत (TYBT), शर्वरी नलावडे (M.Sc. CS), आणि सफा पेवेकर (M.Sc. IT) या पाच विद्यार्थ्यांची Selenium आधारित QA Automation व Manual Testing पदांसाठी निवड झाली आहे.
ExcelR Career Assurance Program (ECAP) या प्रतिष्ठित प्रशिक्षण व प्लेसमेंट उपक्रमामार्फत ही निवड प्रक्रिया पार पडली. ExcelR Career Assurance Program (ECAP) हा उद्योगाभिमुख प्रशिक्षण देणारा आणि विद्यार्थ्यांना विविध प्लेसमेंट संधी उपलब्ध करून देणारा उपक्रम म्हणून ओळखला जातो. विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण परिश्रम, कौशल्यविकास आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांची QA Engineer या पदावर निवड झाली असून त्यांना संपूर्ण भारतामध्ये सेवा करण्याची संधी मिळणार आहे. साधारण ३ महिन्याच्या प्रशिक्षण कालावधीनंतर या विद्यार्थ्यांना रु. ३ ते ५ लाख एवढे वार्षिक पॅकेज मिळणार आहे. तसेच CMS Computers India Private Ltd. या कंपनीमध्ये देखील ‘वैज्ञानिक सहायक’ या पदाकरिता एम.एस्सी. संगणक विभागातील कु. स्नेहल सूर्यवशी, कु. श्रावणी तटकरे, श्री. बक्तियार साबळे, श्री. ओंकार वाघरे आणि कु. मधुरा चव्हाण (एम.एस्सी. आय.टी.) या पाच विद्यार्थ्यांची नावे अंतिम यादीमध्ये आली आहेत. या विद्यार्थ्यांना लवकरच कंपनीकडून मुलाखतीकरिता बोलविण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशामध्ये महाविद्यालयातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि प्लेसमेंट सेलचे सातत्यपूर्ण प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरले आहेत. भविष्यातही विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्लेसमेंट सेल कटिबद्ध असल्याचे प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रा. सुरेश नलावडे यांनी सांगितले. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे नवकोंकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मंगेश तांबे, प्राचार्य डॉ. माधव बापट आणि सर्व कर्मचाऱ्याकडून अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.







