बहादूरशेख नाका उड्डाणपुलाच्या कामाची आमदार भास्कर जाधव यांच्याकडून पाहणी; पावसाळ्यापूर्वी पूल खुला करण्याचे निर्देश

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

चिपळूण: मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण येथील बहादूरशेख नाका येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाची गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी आज प्रत्यक्ष स्थळी जाऊन पाहणी केली. दोन वर्षांपूर्वी या ठिकाणी उड्डाणपुलाचा एक मोठा भाग गर्डरसह कोसळल्याची दुर्घटना घडली होती, त्या पार्श्वभूमीवर आमदार जाधव यांनी कामाच्या दर्जाबाबत आणि सुरक्षिततेबाबत प्रशासनाला धारेवर धरले. पुन्हा अशी दुर्घटना घडू नये म्हणून नेमकी काय काळजी घेतली जात आहे, सध्या कोणत्या उपाययोजना केल्या आहेत आणि पुलासाठी वापरण्यात येत असलेल्या साहित्याचा दर्जा नेमका कसा आहे, याची सविस्तर माहिती त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांकडून घेतली. महामार्गावरील वाढती वाहतूक आणि पावसाळ्यातील संभाव्य अडचणी लक्षात घेता, कोणत्याही परिस्थितीत येत्या पावसाळ्यापूर्वी हा उड्डाणपूल वाहतुकीस खुला करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी कडक सूचना त्यांनी यावेळी संबंधित विभागाला केली.

या पाहणी दौऱ्यावेळी आमदार भास्कर जाधव यांच्यासोबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव, चिपळूण रोट्रॅक्ट क्लबचे अध्यक्ष बाळा आंबुर्ले, नगरसेवक विकी नारळकर, फैसल कास्कर आदी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उप अभियंता नाजीम मुल्ला, शाखा अभियंता शाम खुनेकर, ब्लूम कंपनीचे टीम लीडर वाय. एस. राव, स्ट्रक्चरल इंजिनियर अमोल कारंडे, ब्रिज इंजिनियर अर्जुन छत्तोराय, प्रोजेक्ट मॅनेजर सातपुते, सुरक्षा अभियान अधिकारी शहाबुद्दीन रशीद यांच्यासह अन्य तांत्रिक अधिकाऱ्यांनी कामाच्या प्रगतीबाबत माहिती दिली. या उड्डाणपुलाचे काम दर्जेदार आणि विहित वेळेत पूर्ण करून चिपळूणवासीयांना दिलासा द्यावा, असेही आमदार जाधव यांनी यावेळी स्पष्ट केले.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *