GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण बसस्थानकाच्या रखडलेल्या कामाप्रश्नी काँग्रेस आक्रमक; २४ एप्रिल रोजी आढावा बैठकीचे आयोजन

Gramin Varta
25 Views

चिपळूण: शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बसस्थानकाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले असून, याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस पक्षाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून काँग्रेस आणि शेतकरी कष्टकरी संघटनेच्या वतीने भव्य निदर्शन आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनाची रणनीती ठरवण्यासाठी आणि पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी, २४ एप्रिल २०२६ रोजी काँग्रेसच्या वतीने एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
बसस्थानकाच्या दुरवस्थेमुळे प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचे प्रचंड हाल होत असून वारंवार मागणी करूनही या कामाला गती मिळत नसल्याने जनतेमध्ये तीव्र असंतोष आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्ते महादेव चव्हाण यांनी आंदोलनाबाबतची माहिती प्रसिद्धीस दिली आहे. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सोनलक्ष्मी घाग यांच्या अध्यक्षतेखाली चिपळूणमध्ये महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. या बैठकीला पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन चिपळूण तालुका काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.

रखडलेल्या विकासकामांविरोधात आवाज उठवण्यासाठी काँग्रेसने १ मे रोजी आंदोलनाचे हत्यार उपसले असून, शुक्रवारच्या बैठकीत आंदोलनाचे स्वरूप आणि पुढील दिशा निश्चित केली जाणार आहे. प्रशासनाने या जनभावनेची दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. या बैठकीत जिल्ह्यातील राजकीय घडामोडींसह बसस्थानकाच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा होणार असल्याने याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Total Visitor Counter

3314508
Share This Article