GRAMIN SEARCH BANNER

देवरुख : सांगवे गावाच्या विकासासाठी अभिनेते सुशांत शेलार यांचा पुढाकार

Gramin Varta
3 Views

पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे मांडला प्रस्ताव

देवरुख: मनोरंजन आणि राजकारण या क्षेत्रांत सक्रिय असलेले प्रसिद्ध अभिनेता सुशांत शेलार यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील सांगवे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कंबर कसली असून, सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी स्थानिक प्रतिनिधींच्या शिष्टमंडळासह पालकमंत्री उदय सामंत यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीदरम्यान सांगवे गावातील मूलभूत सुविधा आणि प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करून विकासकामांचा एक व्यापक प्रस्ताव मंत्र्यांकडे सादर करण्यात आला.

या प्रस्तावामध्ये प्रामुख्याने गावातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता यांसोबतच सप्तलिंगी नदीचा गाळ काढून तिचे पुनरुज्जीवन करणे, बहुउद्देशीय सभागृह उभारणे, गणेश विसर्जनासाठी सुरक्षित घाट बांधणे, गावात स्ट्रीट लाईट बसवणे आणि नदीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण करणे अशा महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे. विशेष म्हणजे सुशांत शेलार यांनी या माध्यमातून पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण नियंत्रणालाही प्राधान्य दिले असून, नदी स्वच्छता आणि परिसराचे जतन करण्यावर विशेष भर दिला आहे.

या सर्व विकासकामांना गती मिळावी आणि शासनस्तरावर पाठपुरावा व्हावा या उद्देशाने सुशांत शेलार यांनी मंत्री उदय सामंत यांच्यासह योगेश कदम, संजय राठोड आणि उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांची भेट घेऊन सकारात्मक चर्चा केली आहे. या संदर्भात बोलताना शेलार यांनी सांगितले की, गावातील प्रत्येक नागरिकाला चांगल्या सुविधा मिळवून देणे आणि प्रदूषणमुक्त परिसर घडवणे हाच आमचा मुख्य उद्देश असून, मंत्र्यांनी या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या शिष्टमंडळात सुशांत शेलार यांच्यासोबत सांगवे समाज सेवा संघाचे उपाध्यक्ष नरेंद्र शेलार, सचिव अनिल शेलार, खजिनदार संजय शेलार, सदस्य संजय का. शेलार, दिनेश शेलार, माजी सरपंच देवदत्त शेलार आणि उपसरपंच विश्वास शेलार यांचा समावेश होता. सुशांत शेलार यांनी घेतलेल्या या पुढाकारामुळे सांगवे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, प्रलंबित कामे लवकरच पूर्ण होतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Total Visitor Counter

3342915
Share This Article