राजापूर : शहरातील शिवाजी पथ ते बाजारपेठ परिसरात अनधिकृत मासेविक्रीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या नगर परिषद कर्मचाऱ्यांना एका महिलेकडून विरोध करत शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना घडली. या प्रकरणी राजापूर पोलिस ठाण्यात संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ६ मे २०२६ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास राजापूर नगर परिषदेचे स्वच्छता मुकादम राजन रामचंद्र जाधव (वय ५५, रा. धोपेश्वर पन्हळे, ता. राजापूर) तसेच स्वच्छता निरीक्षक अमित मोहन पोवार हे बाजारपेठ परिसरात सार्वजनिक ठिकाणी मासेविक्री करणाऱ्या महिलांवर कारवाई करण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी अनिसा रशीद फणसोपकर (वय ४०, रा. कातळी सागवे, ता. राजापूर) या बाजारपेठ परिसरात मासेविक्रीसाठी बसल्या होत्या.
नगर परिषद कर्मचाऱ्यांनी संबंधित महिलेला अधिकृत मच्छीमार्केटमध्ये जाऊन मासेविक्री करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, त्यांनी त्या सूचनांकडे दुर्लक्ष करत जागा सोडण्यास नकार दिला आणि तेथेच मासेविक्री सुरू ठेवली. त्यानंतर नगर परिषद कर्मचाऱ्यांनी कारवाईचा भाग म्हणून महिलेची माशांची टोपली ताब्यात घेऊन नगर परिषद कार्यालयाकडे नेण्यास सुरुवात केली. यावेळी संबंधित महिला कर्मचाऱ्यांच्या मागे धावत जाऊन टोपली हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत शिवीगाळ करू लागली.
यानंतर नगर परिषद कार्यालयात जाऊनही संबंधित महिलेने कर्मचाऱ्यांच्या हातातील टोपली खेचून घेत हुज्जत घालत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २२१ व ३५२, महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व औद्योगिक नगर अधिनियम १९६५ मधील कलम २६७ व २६९ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ११५ अन्वये राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
राजापुरात मासेविक्रेत्या महिलेचा नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या शासकीय कामात अडथळा; पोलिसांत गुन्हा दाखल





