छत्रपती संभाजीनगरमधून घेतले ताब्यात
नाशिक: नाशिक येथील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीतील (टीसीएस) लैंगिक अत्याचार आणि बेकायदा धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिला अखेर पोलिसांनी अटक केली आहे.
गेल्या सुमारे 25 दिवसांपासून ती फरार होती. तिला गुरुवारी छत्रपती संभाजीनगर येथून तिला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, निदा खान हिचा शोध घेण्यासाठी नाशिक पोलिसांची 2 विशेष पथके कार्यरत होती. तांत्रिक माहिती आणि गोपनीय तपासाच्या आधारे छत्रपती संभाजीनगर पोलीस तसेच नाशिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत तिला अटक करण्यात आली. अटकेनंतर पुढील चौकशीसाठी निदा खान हिला नाशिक येथे आणण्यात आले आहे. तपासादरम्यान ती छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव परिसरातील कैसर कॉलनी येथील एका फ्लॅटमध्ये राहत असल्याची माहिती समोर आली आहे. त्या फ्लॅटमध्ये निदा खानसह तिचे आई-वडील, भाऊ आणि मावशी असे एकूण 5 जण वास्तव्यास होते, असेही पोलिसांनी सांगितले.दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास नाशिक गुन्हे शाखेकडून सुरू असून, पुढील चौकशीत आणखी माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.







