राजापूर: ऑनलाईन व्यवहारांच्या युगात सायबर गुन्हेगार नवनवीन क्लृप्त्या लढवत असून, बनावट पेमेंट स्क्रीनशॉट दाखवून राजापूर येथील एका काजू व्यापाऱ्याला २३ लाख ९९ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगरमध्ये उघडकीस आला आहे.
राजापूरचे रहिवासी रमेश रामचंद्र वाडकर यांनी भिवंडीतील पंकज भद्रा याने दिलेल्या ऑर्डरनुसार ३,१४० किलो काजूचा माल ट्रकद्वारे अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी पाडा येथील गोदामात पाठवला होता. १५ एप्रिल २०२६ रोजी पहाटे माल उतरवून घेतल्यानंतर, आरोपीने मालाचे पैसे दिल्याचे भासवण्यासाठी वाडकर यांच्या व्हॉट्सॲपवर कोटक महिंद्रा बँकेचा एक ट्रान्झॅक्शन स्क्रीनशॉट पाठवला, ज्यावर अधिकृत यूटीआर नंबरही नमूद होता.
मात्र, वाडकर यांच्या पत्नीच्या बँक खात्यात प्रत्यक्ष रक्कम जमा न झाल्याने त्यांना संशय आला आणि बँकेत चौकशी केली असता तो स्क्रीनशॉट पूर्णपणे बनावट असल्याचे समोर आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वाडकर यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी आरोपी पंकज भद्रा याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक सुरेवाड या प्रकरणाचा तपास करत असून, व्यापाऱ्यांनी अशा बनावट तांत्रिक पुराव्यांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.





