मनोज जाधव/संगमेश्वर: बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर आणि माता रमाई यांच्या क्रांतिकारी विचारांचा वसा जपत, आपल्या प्रगल्भ लेखणी आणि प्रभावी जलशांच्या माध्यमातून धम्म प्रचाराचे प्रेरणादायी कार्य करणारे संगमेश्वर तालुक्यातील सायले गावचे दिग्गज, प्रतिभावंत कवी, लेखक, गायक आणि दिग्दर्शक पांडुरंग शांताराम कदम यांचे सोमवारी, २३ जून २०२५ रोजी सायले येथील त्यांच्या राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने साहित्य आणि कला क्षेत्रात, विशेषतः जलसा परंपरेत, कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
अल्पशिक्षित असूनही, पांडुरंग कदम यांना लाभलेली तेजबुद्धी आणि प्रगल्भता वाखाणण्याजोगी होती. याच बुद्धिमत्तेच्या बळावर त्यांनी अनेक क्रांतिकारी गीते आणि हृदयस्पर्शी कौटुंबिक नाटके लिहिली. त्यांचा पहाडी आवाज, त्यांची गीत गायनाची विशिष्ट लकब आणि सादरीकरणाची शैली श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असे. तो बुलंद आवाज, ती ललकारी आता पुन्हा ऐकायला मिळणार नाही, या विचाराने कला रसिक शोकाकुल झाले आहेत.
आपल्या मायाळू आणि प्रेमळ स्वभावामुळे पांडुरंग कदम यांनी महाराष्ट्रातील अनेक कवी आणि लेखकांशी उत्तम ऋणानुबंध जोडले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात त्यांच्या लेखणीचे चाहते होते. या सर्वगुणसंपन्न जलसाकाराने केवळ सायले गावाचेच नव्हे, तर संपूर्ण संगमेश्वर तालुक्याचे नाव उंचावले होते.
त्यांच्या साहित्यिक क्षेत्रातील कार्याची दखल म्हणून त्यांना विश्व समता कलामंच, लोवले, संगमेश्वर या संस्थेचा राज्यस्तरीय विश्व समता धम्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. एक व्यक्ती म्हणून समाजाच्या आणि कलावंतांच्या जडणघडणीत त्यांचे सिंहाचे योगदान होते. त्यांच्या सान्निध्यात आलेल्या प्रत्येक नवोदित कवी, लेखक आणि जलसाकार कलावंताला त्यांनी घडवण्याचे मोलाचे कार्य केले.
सायले गावाचा जलसा गेली अनेक वर्षे अखंडितपणे सुरू होता, मात्र काही अडचणींमुळे तो थांबला होता. पांडुरंग कदम यांनी पुन्हा नव्या जोमाने आणि उमेदीने सायले गावातील सर्व जलसाकार कलावंतांना एकत्र करून हा थांबलेला जलसा पुन्हा सुरू करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
कवी पांडुरंग कदम यांच्या आकस्मिक निधनाची बातमी समजताच सारेच कलाकार आणि चाहते शोकाकुल झाले. सायले गावचा ‘स्वर कंठमणी’ आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. तमाम परिवर्तनवादी जलसाकारांकडून कवी पांडुरंग कदम यांना भावपूर्ण श्रद्धांजली!