टीव्हीके कडून एआयडीएमके आमदारांच्या पाठिंब्याचे प्रयत्न
चेन्नई: तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापनेवरून राजकीय हालचालींना वेग आला असून राज्यातील सत्तासमीकरणांवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
तमिळगा वेट्री कळगम (टीव्हीके) पक्षाचे प्रमुख विजय बहुमत सिद्ध करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत.
दरम्यान, एआयडीएमके पक्षाच्या 28 आमदारांना पुडुचेरीतील एका खासगी रिसॉर्टमध्ये हलवण्यात आल्याने राज्यातील राजकारण अधिकच तापले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हे आमदार टीव्हीकेला पाठिंबा देण्याबाबत विचार करत आहेत. पुडुचेरीतील पूरानकुप्पम परिसरातील खासगी रिसॉर्टमध्ये एआयडीएमकेचे वरिष्ठ नेते सी. व्ही. शनमुगम यांच्या समर्थक आमदारांना ठेवण्यात आले आहे. टीव्हीके आणि एआयडीएमकेच्या एका गटामध्ये सध्या चर्चेची मालिका सुरू असून उपमुख्यमंत्री पदासह काही महत्त्वाच्या खात्यांवर चर्चा होत असल्याचे समोर आले आहे.
राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, सी. व्ही. शनमुगम यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याचा प्रस्ताव तयार केला जात असून काही महत्त्वाची मंत्रालयेही त्यांच्या गटाला दिली जाऊ शकतात. या चर्चांमध्ये माजी मंत्री आणि टीव्हीके उमेदवार के. ए. सेंगोट्टैयन हे देखील सहभागी असल्याचे सांगितले जात आहे.मात्र, एआयडीएमकेमध्ये अंतर्गत मतभेद उघडपणे दिसून येत आहेत. पक्षाचे महासचिव एडप्पाडी पलानीस्वामी यांनी टीव्हीकेला पाठिंबा देण्याचा प्रस्ताव स्पष्टपणे नाकारला आहे. दुसरीकडे, सी. व्ही. शनमुगम आणि ओ. एस. मणियन यांसारखे नेते सत्तेत महत्त्वाची भूमिका मिळाल्यास गठबंधन सरकारला समर्थन देण्याच्या भूमिकेत आहेत.
टीव्हीके हा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असला तरी बहुमतासाठी त्यांना अजून 5 आमदारांची गरज आहे. काँग्रेसच्या 5 आमदारांचा पाठिंबा मिळाल्यानंतरही विजय यांना आवश्यक संख्याबळ पूर्ण करता आलेले नाही. काही वरिष्ठ नेत्यांनी टीव्हीकेला सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयात जाण्याचा तसेच नव्या निवडणुकांचा पर्यायही सुचवला आहे.
दरम्यान, राज्यपालांसोबत दोन वेळा बैठक झाल्यानंतरही सरकार स्थापनेबाबतचे चित्र स्पष्ट झालेले नाही. टीव्हीके आणि एआयडीएमके यांच्यात युती झाल्यास तमिळनाडूच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.सध्या राज्यात पुन्हा एकदा “रिसॉर्ट पॉलिटिक्स” चर्चेत आली असून पुढील काही दिवसांत तमिळनाडूच्या सत्तेची सूत्रे नेमकी कोणाच्या हाती जाणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.







