रत्नागिरी: शहरातील तेली आळी परिसरात जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी एका तरुणावर स्टीलच्या कड्याने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. सोमवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास गोविंद शेठ यांच्या किराणा दुकानासमोर ही घटना घडली. या हल्ल्यात राकेश गोविंद माकणे (वय १९, रा. खाली ओळ, रत्नागिरी) हा तरुण जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राकेश माकणे आणि आरोपी अमन म्हापसकर हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. सन २०२५ मध्ये गणपती विसर्जनावेळी मांडवी समुद्रकिनाऱ्यावर त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यावेळी हा वाद सामंजस्याने मिटवण्यात आला होता. मात्र, याच वादाचा राग मनात धरून आरोपीने सोमवारी रात्री राकेशवर हल्ला केला. राकेश हा आपल्या पार्थ ठाकूर या मित्रासोबत तेली आळी येथील किराणा दुकानात सामान खरेदीसाठी गेला होता. तो दुकानाबाहेर मोटारसायकलवर बसलेला असताना आरोपी अमन म्हापसकर त्या ठिकाणी आला. त्याने आपल्या हातातील स्टीलचे कडे काढून ते मुठीत पकडले आणि राकेशच्या डोक्यात मागील बाजूला जोराने प्रहार केला.
या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे राकेश रक्ताबंबाळ झाला. आरोपीने त्याला हाताने ढकलून देत ‘तुला आता एवढेच मारले आहे, पुन्हा तुला आणखी मारेन’ अशी जीवे मारण्याची धमकी देऊन तिथून पळ काढला. फिर्यादीचा मित्र पार्थ ठाकूर याने मध्यस्थी करत भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. जखमी राकेशला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून रुग्णालय पोलीस चौकीचे अंमलदार झोरे यांनी त्याचा जबाब नोंदवला आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आरोपी अमन म्हापसकर विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ११८(१) आणि ३५१(२) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक १४९/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.






