चिपळूण: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) 2021 परीक्षेत देशात 237 वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन करणारे चिपळूण तालुक्यातील मांडकी येथील प्रथमेश अरविंद राजेशिर्के यांची ओडिशातील मलकानगिरी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
नक्षलग्रस्त आणि अतिसंवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलकानगिरी जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली असून, या निर्णयामुळे कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
प्रथमेश राजेशिर्के यांनी जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर हे यश मिळवले आहे. कमी वयात जिल्हाधिकारीपदासारखी सर्वोच्च प्रशासकीय जबाबदारी स्वीकारणे ही उल्लेखनीय कामगिरी मानली जाते. जिल्हाधिकारी म्हणून जिल्ह्याचा विकास, कायदा-सुव्यवस्था, आपत्ती व्यवस्थापन, लोककल्याणकारी योजना आणि प्रशासनाचा समन्वय यांसारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर असणार आहेत.
त्यांचे शालेय शिक्षण डेरवण येथील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी सांगली येथील वालचंद महाविद्यालयातून अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली. कॅम्पस मुलाखतीतून पुण्यात नोकरी मिळूनही त्यांनी UPSC च्या तयारीसाठी नोकरीचा राजीनामा देत दिल्लीत जाऊन दीड वर्ष अभ्यास केला.
राज्य सरकारच्या ‘सारथी’ योजनेअंतर्गत मिळालेल्या शिष्यवृत्तीमुळे त्यांना आर्थिक आधार मिळाला. अनेक अडचणींवर मात करत त्यांनी 2021 मध्ये UPSC मध्ये देशात 237 वा क्रमांक मिळवला.
मसुरी येथील प्रशिक्षणानंतर त्यांना ओडिशा कॅडर मिळाले. त्यानंतर त्यांनी बेरहामपूर महानगरपालिका आयुक्त तसेच विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष म्हणूनही कार्यभार सांभाळला आहे. आदिवासीबहुल भागात शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि ग्रामीण विकासासाठी त्यांनी केलेल्या कामाची विशेष दखल घेण्यात आली आहे.
मलकानगिरी जिल्हा नक्षलवादाच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील मानला जातो. अशा परिस्थितीत विकास आणि विश्वास निर्माण करण्याची मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे.
त्यांच्या या नियुक्तीमुळे रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, ते मलकानगिरीमध्येही आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.







