GRAMIN SEARCH BANNER

कडवई येथे आरटीओचे मार्गदर्शन शिबीर आणि आनंद दिघे रिक्षामहामंडळ सभासद नोंदणी संपन्न

Gramin Varta
11 Views

कडवई /मिलिंद चव्हाण: संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय रत्नागिरी यांच्या वतीने ‘धर्मवीर आनंद दिघेसाहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मीटर टॅक्सीचालक कल्याणकारी मंडळा’च्या सभासद नोंदणीबाबत विशेष मार्गदर्शन आणि नोंदणी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. कडवई ग्रामपंचायत हॉल येथे पार पडलेल्या या शिबिरात कडवई, तुरळ आणि चिखली येथील रिक्षा मालक-चालक संघटनेच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या संपूर्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी अशा प्रकारचे कॅम्प आयोजित करून रिक्षा व टॅक्सी चालकांना कल्याणकारी मंडळाच्या योजनांची माहिती दिली जात आहे. कडवई येथील कार्यक्रमात सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक अवधूत कुंभार आणि अक्षय पाटील यांनी उपस्थितांना मंडळाचे फायदे आणि नोंदणी प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित असलेल्या अनेक रिक्षा व्यावसायिकांनी जागीच आपली सभासद नोंदणी पूर्ण केली. या प्रसंगी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांनी शासनाकडे एक महत्त्वाची मागणी केली. मंडळाचे सभासद होण्यासाठी असलेली ‘तीन मुलांची अट’ शिथील करण्यात यावी, जेणेकरून जास्तीत जास्त चालकांना या योजनेचा लाभ घेता येईल, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कडवई ग्रामपंचायत आणि रिक्षा संघटनेच्या वतीने परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. या शिबिरासाठी कडवईचे प्रभारी सरपंच (प्रशासक) दत्ताराम ओकटे, ग्रामविकास अधिकारी राहुलकुमार चौधरी, ग्रामपंचायत कर्मचारी, मोटर वाहन विभागाचे चालक नरसिंह काळे, रिक्षा संघटनेचे खजिनदार रुपेश रहाटे, सदस्य राजेंद्र भोजने, प्रमोद शिंदे, बावा मयेकर, राजा येलोंडे, तुषार कदम आणि इतर सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिवहन विभागाच्या या पुढाकारामुळे स्थानिक रिक्षा चालकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

Total Visitor Counter

3379162
Share This Article