खेड : मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा रक्ताने माखला. खेड तालुक्यातील नातुनगर धरण परिसरात गुरुवारी सायंकाळी भरधाव झायलो कार थेट रस्त्याकडेला उभ्या असलेल्या एलपीजी गॅस टँकरवर आदळल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत भोस्ते मोहल्ला येथील ३३ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दोन चिमुकल्यांसह तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
सायंकाळी ५.४० च्या सुमारास नातुनगर स्टॉपजवळ हा थरकाप उडवणारा अपघात घडला. भरधाव वेगातील एमएच ०८ झेड ३६९२ क्रमांकाच्या झायलोवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार थेट महामार्गालगत उभ्या असलेल्या गॅस टँकरवर जाऊन आदळली. धडक इतकी जबर होती की कारचा पुढील भाग अक्षरशः चिरडला गेला. घटनास्थळी काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या अपघातात सबिया मारुख जसनाईक (वय ३३) यांचा जागीच मृत्यू झाला. इमरान मुरात जसनाईक, अब्दुल अच्चीस जसनाईक (वय ४) आणि सेहरा मारुख जसनाईक (वय ७) हे गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिकांनी तातडीने मदतकार्य करत जखमींना भरणे येथील यश हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
अपघातानंतर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
महामार्गालगत बेफिकिरीने उभी राहणारी अवजड वाहने आता प्रवाशांच्या जीवावर उठत असल्याचा संताप नागरिकांतून व्यक्त होत आहे.
खेडमध्ये भीषण अपघात; झायलो कारची उभ्या गॅस टँकरला धडक, महिला ठार






