GRAMIN SEARCH BANNER

सावर्डे येथे प्लास्टिक बाटल्या संकलनगृहाची स्थापना

Gramin Varta
82 Views

चिपळूण : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सावर्डे गावात प्लास्टिक कचरामुक्तीच्या दिशेने महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला असून गाव, बाजारपेठ तसेच वाडी-वस्त्यांमध्ये ठिकठिकाणी प्लास्टिक बाटल्या संकलनगृह (कचराकुंड्या) उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

या उपक्रमाबाबत माजी सभापती तथा जिल्हा परिषद सदस्या सौ. पूजा शेखर निकम यांनी नागरिकांना स्वच्छतेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले. परिसरातील प्लास्टिक बाटल्या व अन्य कचरा रस्त्यावर किंवा आजूबाजूला न फेकता संकलनगृहात टाकावा, तसेच ओला कचरा घंटागाडीत द्यावा, असे त्यांनी सांगितले.

प्लास्टिक कचरा शेकडो वर्षे कुजत नसल्याने जमिनीची सुपीकता कमी होते. तसेच नाल्यांमध्ये प्लास्टिक अडकल्याने सांडपाणी साचून डासांची उत्पत्ती व विविध आजारांचा प्रसार होतो, असेही त्यांनी नमूद केले.

घरोघरी प्लास्टिक कचरा वेगळा जमा करावा आणि ओल्या कचऱ्यासाठी नाडेप पद्धतीचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले. सावर्डे गाव व वाडी-वस्त्यांमध्ये नाडेप पद्धतीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. “कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करून परिसर स्वच्छ ठेवणे आणि आरोग्याचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. ‘माझे गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाअंतर्गत गाव स्वच्छ व समृद्ध करण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे,” असे आवाहन सौ. निकम यांनी केले.

यावेळी सावर्डे गावातील संजय कोकाटे, रफिक मोडक, डॉ. कृष्णकांत पाटील, देवराज गरगटे, संजय चव्हाण, पंचायत समिती सदस्य शौकतभाई माखजनकर आदी उपस्थित होते.

Total Visitor Counter

3395305
Share This Article