मुंबई: देशभरात मोठी खळबळ उडवून देणाऱ्या नीट पदवीपूर्व परीक्षा पेपरफुटी प्रकरणात दररोज धक्कादायक माहिती समोर येत असून आता या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवानेते अमित ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या परीक्षा प्रक्रियेत थेट सहभागी असलेले रसायनशास्त्राचे माजी प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने अटक केल्यानंतर या घोटाळ्याची व्याप्ती किती मोठी आहे, हे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात आतापर्यंत देशभरातून नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अमित ठाकरे यांनी फेसबुकवरील पोस्टमधून नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या कथित भ्रष्ट आणि भोंगळ कारभारावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, नीट पदवीपूर्व २०२६ परीक्षा रद्द झाल्यामुळे देशातील आणि महाराष्ट्रातील तब्बल २२ लाख विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात गेले आहे. राजस्थान, दिल्ली, गोवा आणि उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये परीक्षेच्या धक्क्यातून अनेक प्रामाणिक विद्यार्थ्यांनी नैराश्यात आत्महत्या केल्याचे सांगत त्यांनी या घटना आत्महत्या नसून “सिस्टीमने केलेला अधिकृत खून” असल्याचा गंभीर आरोप केला.
विद्यार्थी वर्षानुवर्षे प्रचंड मेहनत करून अभ्यास करतात, पालक कर्ज काढून किंवा शेती विकून शिक्षणासाठी पैसा उभा करतात आणि शेवटी शिक्षण माफियांच्या संगनमतामुळे पेपर फुटतो, अशी टीका त्यांनी केली. परीक्षा रद्द करणे हा उपाय नसून सरकार आणखी किती खालची पातळी गाठणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
या घोटाळ्याचे धागेदोरे महाराष्ट्राशी जोडले गेल्याने लाज वाटत असल्याचेही अमित ठाकरे यांनी म्हटले आहे. लातूरचे मूळ रहिवासी आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या पेपर सेटिंग पॅनेलमध्ये सहभागी असलेले प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांनी पुण्यातील राहत्या घरातून विशेष मार्गदर्शन वर्गांच्या नावाखाली मूळ प्रश्नपत्रिका आणि उत्तरे कोट्यवधी रुपयांत विकल्याचा आरोप तपासातून समोर आला आहे. पुण्यातून सुरू झालेले हे रॅकेट नाशिक, अहिल्यानगर, जयपूर आणि हरियाणातील गुरुग्रामपर्यंत पसरल्याचेही त्यांनी नमूद केले. एका प्रश्नपत्रिकेसाठी १५ ते २० लाख रुपये घेतले जात होते, असा आरोपही त्यांनी केला.
ज्यांच्याकडे पैसा आहे तेच डॉक्टर होणार का आणि प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारायचा का, असा संतप्त सवाल करत अमित ठाकरे यांनी या प्रकरणातील सर्व आरोपी, दलाल आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. शिक्षण क्षेत्राला कलंक लावणाऱ्या संस्था आणि संबंधितांची संपत्ती जप्त केली पाहिजे, असेही ते म्हणाले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा आणि प्रामाणिकपणाचा हा लढा असून शिक्षण माफियांवर कारवाई होईपर्यंत शांत बसणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
“विद्यार्थ्यांच्या आत्महत्या म्हणजे सिस्टीमने केलेला अधिकृत खून” – अमित ठाकरे





