GRAMIN SEARCH BANNER

दापोली : गिम्हवणे येथे बेकायदेशीर पानमसाला विक्रीवर छापा, सात हजारांचा मुद्देमाल जप्त

Gramin Varta
13 Views

दापोली : तालुक्यात मानवी शरीराला अत्यंत अपायकारक आणि घातक ठरणाऱ्या प्रतिबंधित पानमसाल्याची बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या एका दुकानावर अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक कारवाई केली आहे. या छाप्यात पोलिसांनी संबंधित दुकानदाराच्या ताब्यातून सात हजार तीनशे बावीस रुपये किमतीचा सुगंधी पानमसाल्याचा बेकायदेशीर साठा जप्त केला असून एका संशयित आरोपीविरुद्ध दापोली पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर दामोदर महाडिक असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संबंधित संशयित दुकानदाराचे नाव आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्या विशेष पथकाकडून दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथे करण्यात आली असून यामुळे अवैध विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

या संदर्भात मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, गिम्हवणे येथील जिल्हा परिषद शाळेच्या जवळ असलेल्या एका दुकानात शासनाने प्रतिबंधित केलेला आणि आरोग्याला हानिकारक असलेला पानमसाला छुप्या पद्धतीने विकला जात असल्याची खात्रीशीर माहिती प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने गिम्हवणे शाळा परिसरातील समीर महाडिक याच्या दुकानावर अचानक छापा टाकला. या झडतीदरम्यान दुकानातून सात हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचा सुगंधी पानमसाला बेकायदेशीरपणे विक्रीसाठी साठवून ठेवल्याचे रंगेहाथ आढळून आले. याप्रकरणी अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त संकेत कणेरी यांनी स्वतः दापोली पोलीस ठाण्यात उपस्थित राहून सरकारतर्फे अधिकृत फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दापोली पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा पुढील कायदेशीर तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3483539
Share This Article