रमेश शिंदे / भडकंबा : संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील आंबा घाटातील गोवरेवाडी बसथांब्याजवळ आज पहाटे झालेल्या भीषण रिक्षा अपघातातील जखमी रिक्षाचालकाचा अखेर मृत्यू झाला. सुरेश शामराव साळोखे (वय ६६) असे मृत चालकाचे नाव असून रत्नागिरी येथे उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. तो मिठाईचे बॉक्स घेऊन गणपतीपुळे येथे चालला होता
पहाटेच्या सुमारास झालेल्या या अपघातामुळे आंबा घाट परिसरात खळबळ उडाली होती. अपघात इतका गंभीर होता की रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जखमी अवस्थेत साळोखे यांना तातडीने उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्यापही स्पष्टता आलेली नाही. अज्ञात वाहनाने रिक्षाला धडक दिल्याची शक्यता व्यक्त केली जात असून साखरपा पोलीस विविध अंगांनी तपास करीत आहेत. अपघाताचे गूढ उकलण्यासाठी आंबा परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची मदत घेतली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेमुळे आंबा घाटातील वाढत्या अपघातांच्या मालिकेबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. साखरपा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
आंबा घाटातील भीषण रिक्षा अपघात; जखमी चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू






