GRAMIN SEARCH BANNER

सुरेश उर्फ बारक्याशेट बने यांच्या नेतृत्वाखाली २४ मे रोजी चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक

Gramin Varta
90 Views

आमदार रोहित पाटील व विजय देसाई यांची उपस्थिती

चिपळूण: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुरेश उर्फ बारक्याशेट बने व महिला जिल्हाध्यक्ष दीपिका कोतवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण तालुक्यात पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने रविवार, दिनांक २४ मे रोजी सकाळी १०.३० वाजता प्रांत कार्यालय शेजारील शिक्षक पतपेढी हॉल येथे महत्त्वपूर्ण संघटन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील महागाई, बेरोजगारी, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठवण्यासाठी पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात येणार असल्याची माहिती युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय केदारी यांनी दिली आहे. आगामी नगरपरिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुरेश उर्फ बारक्याशेट बने यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात पक्ष संघटन नव्या जोमाने कार्यरत असून विविध आघाड्या, सेल व विभागांमध्ये नव्या पदनियुक्तीद्वारे पक्ष अधिक गतिमान करण्यावर भर दिला जात आहे. या बैठकीत चिपळूण तालुकाध्यक्षपदी राजेश केळसकर, शहराध्यक्षपदी समीर दिवाकर देसाई, महिला तालुकाध्यक्षपदी अरुता अडविलकर तसेच महाराष्ट्र ओबीसी सेलच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वासुदेव उर्फ वासुआप्पा मेस्त्री यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा अपेक्षित आहे. महिला जिल्हाध्यक्ष दीपिकाताई कोतवडेकर यांनीही चिपळूण विधानसभा मतदारसंघात महिला संघटन सक्षम करण्यासाठी विशेष प्रयत्न केले असून नव्या नेतृत्वाला संधी दिली आहे. दुसरीकडे अल्पसंख्यांक समाजामध्ये पक्षाची ताकद वाढवण्यासाठी अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष रईस अलवी व महिला शहराध्यक्ष रुक्सार अलवी यांच्यासह विविध पदाधिकारी सक्रिय झाले आहेत.

या बैठकीच्या आयोजनासाठी माजी नगरसेवक, विविध सेलचे पदाधिकारी, युवक कार्यकर्ते व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी पुढाकार घेतला आहे. युवक जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय केदारी यांनी युवकांना पक्षाशी जोडण्याचे काम प्रभावीपणे सुरू ठेवले असून, विधानसभा निवडणुकीनंतरही कार्यकर्त्यांमध्ये उत्साह कायम असल्याचे त्यांनी सांगितले. शरद पवार साहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ राहून पदाधिकारी नव्या उमेदीने काम करत असून जिल्ह्यात पक्षासाठी सकारात्मक वातावरण असल्याचा विश्वास केदारी यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमासाठी सेवादलचे जिल्हाध्यक्ष याकुब खान, सामाजिक न्याय विभागाचे महेंद्र कदम, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुजाताई तांबे, निलिमताई भुवड यांच्यासह ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

या महत्त्वपूर्ण बैठकीला पक्षाचे प्रदेश निरीक्षक तथा रत्नागिरी जिल्ह्याचे निरीक्षक विजय देसाई, महिला जिल्हाध्यक्ष दीपिकाताई कोतवडेकर, विविध सेल व आघाड्यांचे जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे, दिवंगत नेते आर. आर. पाटील (आबा) यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारे युवा नेते आमदार रोहित पाटील या बैठकीला उपस्थित राहणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह आहे. चिपळूण तालुका व शहरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी, युवक, शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांनी या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. बैठकीनंतर सर्व उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहितीही आयोजकांनी दिली.

Total Visitor Counter

3410107
Share This Article