GRAMIN SEARCH BANNER

आंब्यांच्या वादातून नायरी बौद्धवाडीत दोन गटात तुंबळ हाणामारी; सात जणांवर संगमेश्वर पोलिसांत गुन्हा दाखल

Gramin Varta
12 Views

संगमेश्वर: घरानजीक असलेल्या सामाईक जागेतील आंब्याच्या झाडावरील आंबे काढण्याच्या कारणावरून संगमेश्वर तालुक्यातील नायरी बौद्धवाडी येथे दोन गटात जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या वादात लाठ्याकाठ्या आणि दगडाने केलेल्या मारहाणीत एकाच कुटुंबातील तिघेजण जखमी झाले आहेत.

याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील महिला आणि दोन अल्पवयीन मुलांसह सात जणांविरोधात बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नायरी येथील फिर्यादी श्रावणी रंजित पवार (वय ३२) आणि आरोपी यांची घराशेजारीच सामाईक जागा आहे. या जागेत आंब्याची दोन कलमी झाडे आहेत. २२ मे रोजी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलाने (आरोपी क्र. ६) या सामाईक झाडावरील आंबे काढले आणि तो ते घेऊन जात होता. हे पाहून फिर्यादींचे पती रंजित पवार यांनी त्याला अडवले. “सामाईक झाडावरील आंबे तुम्ही एकटेच येऊन काढून घेऊन जाता, हे काय तुमचे एकट्याचे झाड आहे का?” असा जाब त्यांनी विचारला.

यावरून संतापलेल्या त्या अल्पवयीन मुलाने घडलेला सर्व प्रकार अंकुश जयराम पवार यांना सांगितला. याचा तीव्र राग मनात धरून अंकुश जयराम पवार, अमिता अंकुश पवार, सोळा वर्षीय अल्पवयीन बालक, मंगेश सिताराम पवार (वय ४५), माया जयराम पवार (वय ७५), दुसरा सोळा वर्षीय अल्पवयीन बालक आणि मंगेश पवार यांचा २२ वर्षीय मुलगा (नाव माहीत नाही) अशा सर्वांनी मिळून बेकायदेशीर जमाव जमवला. या सर्वांनी फिर्यादी श्रावणी पवार, त्यांचे पती रंजित पवार आणि मुलगी आस्था पवार यांना घेरून लाथाबुक्क्यांनी, लाकडी काठीने तसेच दगडाने बेदम मारहाण केली. या अचानक झालेल्या हल्ल्यात श्रावणी पवार, रंजित पवार आणि आस्था पवार हे तिघेही जखमी झाले आहेत.

या घटनेनंतर श्रावणी पवार यांनी २३ मे रोजी सकाळी संगमेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून संगमेश्वर पोलिसांनी अंकुश पवार, अमिता पवार, मंगेश पवार, माया पवार, त्यांच्यासोबतचे दोन अल्पवयीन मुले आणि मंगेश पवार यांचा मुलगा अशा सात जणांवर भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १८९(२), १९०, १९१(२), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) अंतर्गत गुन्हा रजिस्टर क्रमांक ५७/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास संगमेश्वर पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

3484458
Share This Article