रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या आपत्कालीन ‘डायल ११२’ सेवा प्रणालीने नागरिकांना तात्काळ मदत आणि जलद प्रतिसाद देण्यामध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे. प्रभावी अंमलबजावणी आणि सुयोग्य नियोजनाच्या बळावर रत्नागिरी पोलिसांनी प्रतिसाद वेळेत (Response Time) लक्षणीय सुधारणा केली असून, महाराष्ट्र राज्यात ३२ व्या क्रमांकावरून थेट ७ व्या क्रमांकावर झेप घेत पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये येण्याचा बहुमान पटकावला आहे.
जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षामध्ये ‘डायल ११२’ प्रणालीवर प्राप्त होणाऱ्या विविध आपत्कालीन कॉल्सवर तत्काळ कार्यवाही करून संबंधित पोलीस ठाणे व मोबाईल पथकांना तात्काळ माहिती दिली जाते. जानेवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत रत्नागिरी जिल्हा पोलिसांना एकूण ७,४०० कॉल्स प्राप्त झाले होते, ज्यावर पोलिसांचा सरासरी प्रतिसाद वेळ ०८.४५ मिनिटे इतका होता. या कामगिरीच्या आधारे त्यावेळी राज्यामध्ये जिल्ह्याचा ३२ वा क्रमांक होता. या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे यांनी विशेष लक्ष केंद्रित केले. डायल ११२ च्या अधिकाऱ्यांना योग्य सूचना व मार्गदर्शन करून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांनी कामाचा दररोज आढावा घेणे सुरू केले. येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्यावर तत्काळ उपाययोजना केल्यामुळे ही सेवा अधिक जलद पुरवण्याच्या दृष्टीने अचूक नियोजन करण्यात आले.
या नव्या नियोजनाचे अत्यंत सकारात्मक परिणाम यंदा पाहायला मिळाले आहेत. जानेवारी २०२६ ते मे २०२६ या कालावधीचा आढावा घेतला असता, प्राप्त झालेल्या ९२१ कॉल्सवर पोलिसांनी अतिशय जलद कार्यवाही केली. या काळात पोलिसांचा सरासरी प्रतिसाद वेळ लक्षणीयरीत्या सुधारून तो अवघा ०६.३४ मिनिटे इतका झाला. वेळेत पोहोचल्यामुळे भांडणे, अपघात, महिलांविषयीच्या तक्रारी, वैद्यकीय आणि कायदा व सुव्यवस्थेच्या अनेक घटनांमध्ये जीवितहानी टाळणे, वाद शांत करणे आणि नागरिकांना सुरक्षित मदत पुरवणे पोलिसांना शक्य झाले आहे.
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांच्या समन्वयपूर्ण आणि तत्पर कामगिरीमुळेच ही उल्लेखनीय सुधारणा साध्य झाली आहे. भविष्यातही नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत अशीच जलद आणि परिणामकारक सेवा देण्याच्या उद्देशाने पोलीस दल सातत्याने कार्यरत राहील. दरम्यान, या सेवेमध्ये कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अधिक सतर्क राहावे अशा सूचना पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे यांनी दिल्या आहेत. तसेच, नागरिकांनी कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी घाबरून न जाता ‘डायल ११२’ या क्रमांकाचा निर्धास्तपणे व विश्वासाने वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.






