चिपळूण: शहरातील पिंपळी नाका येथे दुचाकी लावण्याच्या किरकोळ कारणावरून एका ५७ वर्षीय प्रौढाला लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सतीष हनुमंत नलावडे (वय ५७, रा. पिंपळी खुर्द, मारुती नगर, पाष्टेवाडी, ता. चिपळूण) हे रविवारी, २४ मे रोजी रात्री साडेसातच्या सुमारास पिंपळी नाका येथे मुलांना खाऊ आणण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी संशयित आरोपी बाळू चव्हाण याला ‘मला गाडी लावायची आहे, तुम्ही थोडे बाजूला व्हा’ असे सांगितले. या साध्या बोलण्याचा राग आल्याने आरोपी बाळू चव्हाण याने नलावडे यांना थेट शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ‘तुला दुसरीकडे जागा नाही का?’ असे म्हणत तो नलावडे यांच्या अंगावर धावून गेला.
या वादादरम्यान सतीष नलावडे हे आपली दुचाकी बाजूला घेत असताना, त्यांच्या गाडीचा धक्का चुकून बाळू चव्हाण याला लागला. यामुळे संतप्त झालेल्या बाळू याने नलावडे यांच्या जवळ जाऊन त्यांच्या कानशिलात लगावली. याच वेळी तिथे उपस्थित असलेल्या सुयोग चव्हाण (पूर्ण नाव माहीत नाही) या दुसऱ्या संशयित आरोपीने नलावडे यांचे दोन्ही हात पाठीमागून घट्ट धरून ठेवले आणि शिवीगाळ केली. नलावडे हतबल झाले असतानाच, बाळू चव्हाण याने जमिनीवर पडलेला एक दगड उचलून थेट नलावडे यांच्या डोक्यात मारला. या जबर मारहाणीत नलावडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून ते जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर सतीष नलावडे यांनी तातडीने पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. सोमवारी, २५ मे रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली. चिपळूण पोलिसांनी संशयित आरोपी बाळू चव्हाण आणि सुयोग चव्हाण यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि नवीन कायद्याच्या संबंधित कलमांनुसार (कलम ३२४, ३२३, ५०४, ३४ तसेच ११८(१), ११५(२), ३५२, ३(५)) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.





