GRAMIN SEARCH BANNER

विनायक राऊत यांच्यामुळे कोकणातील तरूण बेरोजगार- आ. जठार यांचे टीकास्त्र

Gramin Varta
83 Views

चिपळूण (प्रतिनिधी) : कोकणातील राजापूर परिसरात येऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाला माजी खासदार विनायक राऊत यांनी विरोध केल्यामुळे दोन लाख तरुण रोजगारापासून वंचित राहिले, असा आरोप नवनियुक्त विधानपरिषद आमदार प्रमोद जठार यांनी केला. चिपळूण येथील भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी भाजपा दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, उत्तर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, तालुकाध्यक्ष विनोद भुरण, शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी, महिला शहराध्यक्षा रसिका देवळेकर, उपनगराध्यक्षा रुपाली दांडेकर, नगरसेवक शुभम पिसे, संदीप भिसे, नगरसेविका अंजली कदम, वैशाली निमकर, स्वानंद रानडे, सारिका भावे, माजी नगरसेवक विजय चितळे, रत्नदीप देवळेकर आदी उपस्थित होते. पत्रकार परिषदेत बोलताना आ. जठार म्हणाले की, सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी रात्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी मलाच उमेदवारीचा आग्रह केला होता. मात्र मी पक्ष सोडणार नसल्याचे सांगत विनायक राऊत यांना संधी द्यावी, असे सांगितले होते. त्यामुळेच ते खासदार झाले, असा दावा त्यांनी केला.

रिफायनरीसारखा मोठा प्रकल्प कोकणात येत असताना विनायक राऊत आणि काही स्वयंसेवी संस्था तसेच स्थानिकांनी त्याला विरोध केला. त्यामुळे हा प्रकल्प मागे गेला. हा प्रकल्प झाला असता तर कोकणातील युवकांना मोठ्या प्रमाणात सोजगार उपलब्ध झाला असता तसेच मुंबई-सुम्याकाडे होणारे स्थलांतर कमी झाले असते. दोन लाख तरुणांना रोजगार मिळण्याची संधी गमवावी आमती, असे ते म्हणाले. तसेच पक्षाच्या वतीने ‘आमदार आपल्या दारी, तुमची समस्या आमची जबाबदारी’ हा कृती कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आतापर्यंत झालेली विकासकामे लोकांपर्यंत पोहोचविणे आणि जी कामे अपूर्ण राहिली आहेत ती पुढील पाच वर्षांत पूर्ण करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

कोकणासाठी मंजूर झालेले सैनिक स्कूल साताऱ्याला हलविण्यात आल्याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात पालकमंत्री, स्थानिक आमदार तसेच अन्य कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. साताऱ्यात आधीच सैनिक स्कूल असताना कोकणासाठी मंजूर झालेले स्कूल तेथे हलवू नये आणि ते कोकणातच सुरू ठेवावे, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशभर चर्चेत असलेल्या ‘कॉक्रोज जनता पार्टी’ वर भाष्य करताना आ. जठार म्हणाले की, भारतीय जनता पार्टी हे भारतीय नाव घेऊन चालणारे राष्ट्रवादी विचारांचे पक्ष आहे. त्याचे विकृतीकरण करून अशा प्रकारची भाषा वापरणाऱ्यांना सबुध्दी मिळावी, अशी अपेक्षा आहे. आंदोलन करणे, सोशल मीडियाचा वापर करणे हा प्रत्येकाचा अधिकार असला तरी कोणत्याही राजकीय पक्षाचा अवमान होईल, असे नाव वापरणे योग्य नसल्याचा सल्लाही त्यांनी दिला. नरेंद्र मोदी यांनी २६ मे २०१४ रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती याला २६ मे २०२६ रोजी बारा वर्षे म्हणजे एक तप पूर्ण होत आहे. या निमित्त संपूर्ण देशभर भारतीय जनता पार्टीतर्फे २६ मे ते २१ जून २०२६ हा महिना तपपूर्ती मास म्हणून विविध कार्यक्रम घेऊन साजरा केला जाणार आहे. या १२ वर्षात १० ठळक जनहिताची कामे केली असे आमदार प्रमोद जठार यांनी यावेळी सांगितले.

या काळात अर्थव्यवस्था वेगाने वाढवली. २०१४ मध्ये भारत ११ वी मोठी अर्थव्यवस्था होती ती २०२५ ला ४ थ्या क्रमांकावर आणली. कलम ३७० रद्द करून जम्मू – काश्मीर एकात्मता केली. अयोध्येत २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा, डिजिटल इंडिया क्रांती, स्वच्छ भारत मिशन योजनेतंर्गत १२ कोटी शौचालये बांधली. हायवे, रेल्वे, विमानतळ उभारून पायाभूत सुविधा निर्माण केल्या. जीएसटी हा एक राष्ट्र कर लागू केला. आयुष्मान भारत योजनेत नागरिकांना ५ लाखापर्यंत मोफत उपचार केले. कोविडमध्ये २२० कोटी लस डोस देऊन जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम घेतला. यशस्वी चांद्रयान मोहीम, त्यांनतर आदित्य १ सौर मोहीम यंशस्वी केली. नारी शक्ती तिहेरी तलाक प्रथा कायद्याने रद्द करून मुस्लिम महिलांना न्याय दिला. सैन्यात महिलांना प्रवेश, बेटी बचाओ बेटी पढाओ, उज्ज्वला योजनेतून १० कोटी मोफत कनेक्शन ७० टक्के आवास योजना झाल्या अशी माहिती आ. प्रमोद जठार यांनी दिली. जिल्ह्यात ५ जूनपासून विविध कार्यक्रम राबविण्यात येणार असून दोन्ही जिल्हाध्यक्षांसह सर्व पदाधिकारी यात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Total Visitor Counter

3420613
Share This Article